fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsNATIONALSportsTOP NEWS

Under 19 – भारतीय महिला संघाने जिंकला विश्वकप

केपटाऊन : भारताच्या अंडर १९ महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडणा-या अंडर-१९ महिला टी २० विश्वचषकावर भारतीय संघाने नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला ७ विकेट्सच्या फरकाने मात देत विश्वचषकावर भारतीय संघाचे नाव कोरले आहे. आधी गोलंदाजी निवडून भारताने संपूर्ण इंग्लंड संघाला अवघ्या ६८ धावांत गुंडाळले. ज्यानंतर ६९ धावाचे माफक आव्हान केवळ तीन विकेट्सच्या बदल्यात १४ षटकांत पूर्ण करत सामना आणि विश्वचषक जिंकला आहे.

तर भारत विरुद्ध इंग्लंड या फायनलच्या सामन्याचा विचार करता सर्वप्रथम नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडला स्वस्तात रोखून निर्धारीत लक्ष्य पार करण्याचा भारताचा डाव होता. कर्णधाराच्या निर्णयाला साजेशी खेळी करत भारतीय महिलांनी सुरुवातीपासून इंग्लंडच्या खेळाडूंना तंबूत धाडणे सुरू ठेवले. १७.१ षटकांत संपूर्ण इंग्लंडचा संघ ६८ धावांवर सर्वबाद केले. यावेळी भारताच्या सर्वच महिलांनी उत्तम गोलंदाजी केली. यामध्ये तीतस साधूने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत ४ षटकांत केवळ ६ धावा देत दोन विकेट्सही घेतल्या. अर्चना देवी, पार्शवी चोप्रा यांनीही प्रत्येकी दोन मन्नत कश्यप, शेपाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. इंग्लंडकडून रॅना हिने सर्वाधिक १९ धावा केल्या.

१२० चेंडूत ६९ धावाचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय महिलांनी आल्या आल्या स्फोटक खेळी सुरु केली. एक चौकार आणि एक षटकार ठोकून कॅप्टन शेफाली १५ धावांवर तंबूत परतली. सेमीफायनलमध्ये कमाल कामगिरी करणारी श्वेताही ५ धावा करुन बाद झाली. पण नंतर सौम्या तिवारी आणि गोगंदी त्रिशा यांनी एक चांगली भागिदारी करत भारताचा विजय पक्का केला. त्रिशा २४ धावा करुन बाद झाली. पण तोवर भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. सौम्याच्या नाबाद २४ धावांच्या जोरावर भारताने १४ षटकांत ६९ धावा करत सामना आणि विश्वचषक जिंकला आहे.

आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारताच्या कामगिरीचा विचार करता सुरुवातीपासून भारताने चांगली कामगिरी केली आहे. भारताचा संघ ड गटात होता. यादरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र दुस-या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

ज्यानंतर स्पर्धेत एकही सामना न गमावलेल्या न्यूझीलंडला भारताने आठ विकेट्स राखून मात देत सामना जिंकला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला. दुसरीकडे इंग्लंड संघाचा विचार करता त्यांनीही आपल्या नावाला साजेशी खेळी सुरुवातीपासून केली होती. सेमीफायनलमध्ये त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान होते, जे देखील त्यांनी पार करत फायनल गाठली. ज्यानंतर फायनलमध्ये एक सोपा विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading