fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

संस्कारक्षम, समाजाभिमुख माणूस घडविण्याची गरज अश्विनी शेवाळे यांचे प्रतिपादन

पुणे : “पालकांनी, शिक्षकांनी आपल्या मुलांवर घारीसारखी नजर ठेवून चांगले संस्कार व विचार दिले, तर त्यांची उत्तम जडणघडण होईल. समाजस्वास्थ्य चांगले राहण्यासाठी संस्कारक्षम, समाजाभिमुख माणूस घडविण्याची गरज आहे,” असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य अश्विनी शेवाळे यांनी व्यक्त केले.

जाणीव व वंचित विकास संस्थेतर्फे शुभदा-सारस्वत प्रकाशन पुरस्कृत ‘सुकृत पुरस्कार’ सोलापूर येथील पारधी व भटक्या समाजातील मुलांसाठी काम करणाऱ्या संस्कार संजीवनी फाउंडेशनचे संस्थापक परमेश्वर काळे यांना प्रदान करण्यात आला. तुळशीबाग गणेश मंडळाचे नितीन पंडित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. हिंसा व गुन्हेगारी विरोधात काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. पत्रकार भवनमध्ये झालेल्या सोहळ्यावेळी वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, कार्यवाह संचालक मीना कुर्लेकर, संचालक सुनीता जोगळेकर, प्रकाशनाचे शरद गोगटे आदी उपस्थित होते.

अश्विनी शेवाळे म्हणाल्या, “सध्याचा जमाना ‘इन्स्टंट’चा आहे. त्यामुळे मुलांना एखादी गोष्ट लगेच मिळाली नाही, तर ती चिडचिडी, रागीट होतात. क्षणिक आनंदासाठी चुकीचे पाऊल उचलतात. त्यातून गुन्हेगारीला पाय फुटू लागतात. हे सगळे बदलण्यासाठी मुलांना अपमान पचवायला शिकवले पाहिजे. समाजाभिमुख कार्याची ओळख करून द्यायला हवी. गुन्हेगारीचा शिक्का असलेल्या समाजातील मुलांना घडविण्याचे अवघड काम परमेश्वर काळे नेटाने करत आहेत.”

सत्काराला उत्तर देताना परमेश्वर काळे म्हणाले, “भटक्या विमुक्तांसाठी काम उभारताना अनंत अडचणी आल्या; पण डगमगलो नाही. मुलांनी, पत्नीने साथ दिली. प्रवास सहज वाटत असला, तरी प्रत्यक्षात जगताना मरणयातना सहन कराव्या लागतात. पारधी, भटक्या जातीतील, पालावर राहणाऱ्या पोरांना घडविण्याचे काम सुरु आहे. माणूस म्हणून घडण्याची संधी आणि प्रशासनाकडून योग्य वागणूक त्यांना मिळावी. देश अमृतमहोत्सव साजरा करत असताना अनेक पालांवर, वस्त्यांवर स्वातंत्र्याचा किरण पोहोचलेला नाही. त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी माझा झगडा सुरु आहे.”

नितीन पंडित म्हणाले, “गुन्हेगारी वेगवेगळ्या वळणावर येत आहे. त्यातून वाचण्यासाठी संस्कार फार महत्वाचा आहे. वंचित विकास संस्थेने काळे यांच्यासारख्या व्यक्तीला सन्मानित करून एक आदर्श वस्तुपाठ दिला आहे. अशा कामांना मदत करण्यासाठी पुण्यातील गणपती मंडळे, विधायक कार्यकर्ते नेहमीच पुढे येतात. त्यामुळे काळे यांनी आणखी जोमाने काम करावे.”

देवयानी गोंगले यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. मीनाक्षी नवले, चैत्राली वाघ, तृप्ती फाटक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शमसुद्दीन शेख यांनी जाणीव व वंचित विकास संस्थेच्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading