Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : भारत मार्ग हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारीत सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर ॲन अनसर्टेन वर्ल्ड’ या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक परराष्ट्रमंत्री डॉ. एस.जयशंकर, विजय चौथाईवाले, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ.गिरीश आफळे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.

युरोपचा विचार म्हणजे जगाचा विचार नाही हे सुनावण्याचे काम परराष्ट्रमंत्री डॉ.जयशंकर यांनी केले, ही खंबीरता भारताच्या परराष्ट्र मंत्र्यात अनेक वर्षांनी पहायला मिळाली असे नमूद करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे धोरण देशाहिताचा विचार करणारे असून कोणाच्याही दबावात येणारे नाही हे जगाला दाखवून दिले. भारत जगाच्या पाठीवर मजबूत देश म्हणून उभा राहिला आहे आणि त्याचवेळी अमेरिका किंवा रशिया यांच्या दबावात ज्यांना यायचे नाही असे सगळे देश मोदींजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारताच्या पाठीशी उभे आहेत. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश आहे.

जगातील देशांचा विश्वास हेच आपले यश
जी-२० पूर्वी सव्वाशेपेक्षा अधिक देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चर्चा करून आपली भूमिका भारताने मांडावी असे सांगतात तेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाने प्राप्त केलेली शक्ती लक्षात येते. कोविडच्या काळातही अमेरिकेने केवळ भारतासाठी आपले धोरण बदलून भारताला आवश्यक कच्ची सामुग्री दिली. यावरून भारताने मिळवलेले यश लक्षात येते. आजच्या परिस्थितीत मजबूत देश म्हणून भारत पुढे येत असताना पंतप्रधानांसोबत आपली क्षमता पणाला लावणाऱ्या डॉ.जयशंकर यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणे ही पर्वणी आहे, असे त्यांनी सांगितले.

परराष्ट्र धोरणासंदर्भात भारतीय विचार दर्शविणारे पुस्तक
उपमुख्यमंत्री म्हणाले, पुस्तकात परराष्ट्र धोरणावरील तीन ओझी सांगितली आहेत. पहिले फाळणीचे, दुसरे उशिरा सुरू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे आणि तिसरे आण्विकदृष्टया आपण सक्षम असतानाही त्याला पुढे नेण्यात आपण गमावलेला काळ. त्यामुळे परराष्ट्र धोरणावर परिणाम झाल्याचे पुस्तकात मांडण्यात आले आहे. त्यासोबत चीनने रशिया आणि अमेरिकेच्या मदतीने प्रगती साधली असताना आपण का मागे पडलो याचा उल्लेखही पुस्तकात आहे. आत्ताची भूराजकीय परिस्थिती, तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा यांचा देशावर काय परिणाम होणार आहे याची माहिती पुस्तकात आहे.

क्षमता आणि सहकार्याचा भारत मार्गच देशासाठी उपयुक्त – डॉ.एस.जयशंकर
परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर म्हणाले, जागतिकीकरण हे आजची वास्तविकता असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासोबत त्यातील संधींचाही विचार करावा लागेल. पुरवठा साखळी आणि डेटा व्यवस्थापन हे जगात मोठे आव्हान आहे. उद्योगाला प्रोत्साहन देऊन देशात तंत्रज्ञान आणि उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत मार्ग जगाच्या आजच्या परिस्थितीत इतरांसाठी उपयुक्त असणारा विचार आहे. प्रगती, क्षमता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विचार अनुसरणारा आणि विकसनशील देशांचा आवाज बनणारा भारतमार्ग देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मार्गावर पुढे गेल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकेल.

डॉ.आफळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भारतीय विचार साधनाने आतापर्यंत ६३० पुस्तके प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट प्रकाशन संस्थेसाठी असलेला पु. भागवत पुरस्कार मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणाऱ्या सविता आठवले यांचा परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading