Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

देशातील प्रादेशिक पक्ष मजबूत झाले पाहिजेत – आमदार महादेव जानकर 

पुणे : राष्ट्रीय पक्षांना तळागाळातील प्रश्न समजण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी फार वेळ लागतो. त्याऐवजी प्रादेशिक पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जनतेने बळ देऊन विधानसभा आणि लोकसभेत पाठवले पाहिजे. देशातील प्रादेशिक पक्ष मजबूत झाले तरच या देशातील लोकशाही अधिक बळकटपणे टिकून राहू शकेल, अशी भावना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या युवा संसदचे उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे, इम्तियाज जलील आणि रामदास तडस यांना यावेळी आदर्श खासदार पुरस्कार, नगरसेवक वसंत मोरे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार तर जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील ठाकरे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने  महादेव जानकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

महादेव जानकर म्हणाले, पैसा आणि घराणेशाही नसली तरीही सर्वसामान्य माणूस राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतो हा आत्मविश्वास युवा संसद सारख्या उपक्रमाच्या  माध्यमातून तरुणांमध्ये निर्माण होतो. तरुणच या देशाचे उज्वल भवितव्य घडविणार आहे.

रामदास तडस म्हणाले, ४० वर्षाच्या राजकारणात वैयक्तिक जरी मी श्रीमंत झालो नसलो तरी जनता हीच माझी श्रीमंती आहे. युवकांनी राजकारणात येणे ही काळाची गरज आहे. युवकांच्या खांद्यावरच उद्याच्या देशाची जबाबदारी आहे.
श्रीरंग बारणे म्हणाले, आत्मविश्वास असेल तर आपण राजकारणातही यशस्वी होऊ शकतो त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपले काम पोहोचले पाहिजे .त्यासाठी कायम मनामध्ये सर्वसामान्यांविषयी तळमळ असणे गरजेचे आहे.

अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या, सुशिक्षित तरुण  देशाचा विकास गतीने करू शकतो त्यामुळे तरुणांनी शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. उच्च शिक्षण घेऊन इंदापूर मधील ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्यांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाल्यामुळे येथील प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या विकासासाठी काम करता येत आहे.

अॅड.  शार्दुल जाधवर म्हणाले, हा मंच कोणत्याही पक्षाचा किंवा सरकारचा नाही तर युवकांचा मंच आहे .जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणारी पिढी निर्माण करणे हा या युवा संसदेमागील उद्देश आहे. या मंचाच्या माध्यमातून देशाचे उज्वल भवितव्य घडविणारे राजकारणी निर्माण होतील याचा आम्हाला विश्वास वाटतो. प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांनी आभार मानले.

अदानी आणि अंबानीच देश चालवतात – इम्तियाज जलील

सध्या केवळ दोन माणसेच देश चालवत आहे. ते म्हणजे अदानी आणि अंबानी. उद्योजकांचे आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते आणि अर्थमंत्रीही त्याचे समर्थन करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. या देशातील सुशिक्षित तरुणांना हेच आठ लाख कोटी रुपये दिले असते तर त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाले असते. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी हा स्तंभही आता निष्पक्ष राहिलेला नाही. कोणाची तरी बाजू घेतल्याशिवाय कोणताही वर्तमानपत्र किंवा चॅनल पत्रकारिता करू शकत नाही अशी सध्या देशातील परिस्थिती आहे. माणूस माणसाला बघून जेव्हा मतदान करेल तेव्हाच देशाची परस्थिती बदलेल. जात,धर्म पाहून जेव्हा मतदान होते,तेव्हा आपल्याला देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देखील रस्ते आणि पाण्यासाठी मागणी करावी लागते, असेही त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading