भुसावळ परिसरात भूकंपाचा धक्का; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
जळगाव : जिल्हयातील भुसावळ, सावदा परिसरात आज (दि. 27) सकाळी साडे दहाच्या सुमारास 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. दरम्यान, या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत वा वित्तहानी झाल्याची बाब अजूनपर्यंत निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी नगरिकांना केले आहे.
भूकंपाविषयी कुठलीही माहिती द्यावयाची असल्यास अथवा मदत हवी असल्यास दुरध्वनी क्रमांक 0257- 2223180 व 0257- 2217193 या क्रमांकावर नागरीकांनी संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांचे आवाहन
भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अडचण असल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहेत.