भूकंपादरम्यान काय करावे ?
भूकंप होत असताना तुम्ही जिथे कुठे असाल तिथे जमिनीवर पडा किंवा मजबूत टेबलाखाली आसरा घ्या. जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरून ठेवा. जर जवळपास टेबल नसेल तर जमिनीवर झोपा, पाय पार्श्वभागावर घ्या, डोके गुडघ्याजवळ घ्या, डोक्याच्या बाजू कोपरांनी झाकून घ्या आणि हात माने भोवती घ्या. तुम्ही एखाद्या जागेच्या आतमध्ये धक्के बसणे बंद होईपर्यंत आतच राहा. भूकंपाचा धक्क्यावेळी बेडरूममध्ये असाल तर उशीच्या सहाय्याने डोके वाचवा.
जर तुम्ही भूकंपाचा धक्का बसत असताना इमारतीच्या आत असाल तर ?
घरातील सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. (उदा. टेबलाखाली, बीमखाली, तुळईखाली, दरवाजाच्या चौकटीखाली, कॉलमजवळ) लिफ्टचा वापर करू नका. दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करू नका. स्वतः शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. संबंधीत यंत्रणांना त्वरीत कळवा.
जर तुम्ही रस्त्यावर असाल तर ?
पटकन मोकळ्या जागेत जा, घाई-गडबड, दंगा करू नका. उंच, जुन्या आणि सलग असणान्या इमारतीपासून भिंती, विजेच्या तागंपासून लांब थांबा.
भूकंपानंतर काय करावे ?
रेडिओ/टि.व्ही. वरून मिळणाऱ्या आपत्तीविषयक सूचनांचे पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका व पसरवू नका. जुन्या इमारती, नुकसान झालेल्या इमारतीजवळ जाऊ नका व विजेच्या तारा, दगडी भिंतीपासून दूर रहा. पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरू असल्यास बंद ठेवा. बांधकाम तज्ञांकडून इमारतीची तपासणी करून ती किती कमजोर झाली याची माहिती घ्या. जर काही व्यक्ती जमिनीत गाडल्या गेले असतील तर घटनास्थळी थांबा व त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करा. शोध व बचाव यंत्रणेस तात्काळ कळवा.
