.. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करा; साधू महंतांची मागणी
नाशिक : धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातील वाद आता अधिक चिघळत चालला आहे. अंनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असतानाच आता अंनिसविरोधात साधू महंत देखील आक्रमक झाले आहेत. आंनिस फक्त हिंदू धर्माविरोधातच आवाज उठवत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यायचा उद्देशच भरकटला आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदाच रद्द करा, अशी मागणी साधू महंतांनी केली आहे.
आज नाशिक येथील रामकुंड परिसरात साधू महंत यांची बैठक झाली. या बैठकीस सर्व आखाड्याचे साधु संत, संन्यासी, पुरोहित संघ आणि हिंदुत्ववादी संघटना उपस्थित होत्या. यावेळी अंनिस विरोधात तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
अनिकेत शास्त्री म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या निर्मितीचा उद्देश भरकटला आहे. या कायद्या अंतर्गत केवळ हिंदूंना टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदाच रद्द करावा, अशी मागणी यावेळी साधू महंतांनी केली आहे. या संदर्भात राज्य सरकारला देखील निवेदन देणार असल्याचे महंत अनिकेतशास्त्री जोशी यांनी सांगितले. तसेच मौलाना, फादरी, भंते यांनी चमत्कार सिद्ध करावेत, ते चमत्कार सिद्ध झाले तर आम्ही 51 लाख रुपयांचं बक्षीस देवू, असे चॅलेंजही अनिकेत शास्त्री यांनी दिले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्री नागपूरात आल्यापासून त्यांचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर अंनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांना चमत्कार दाखवा आणि तीस लाख रुपये मिळवा, असे आव्हान दिले होते. तसेच अंनिसने याविरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महंत अनिकेत शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली साधू महंत एकवटले होते.
