.. म्हणून आम्ही एकत्र आलो – उद्धव ठाकरे
शिवशक्ती – भीमशक्ती युतीची घोषणा
मुंबई : देश हुकूमशाहीकडे चालला आहे. नवा हुकूमशहा भारतात उदयास येत आहे. देशात काय चाललंय हे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदोउदो करायचा अन् निवडणुका गेल्यावर गरीब रस्त्यावर आणि पंतप्रधानांची उड्डाण सुरू होतात. हे रोखण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व परंपरा आणि चाली मोडून ‘देश प्रथम’ हा मुद्दा घेवून आम्ही एकत्र आलो आहोत, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्याची घोषणा केली. त्यामुळे वंचित आघाडी आणि ठाकरे गट आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार हे स्पष्ट आहे. दरम्यान, ही युती शिवसेने सोबत असली तरी राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस या युतीला पाठिंबा देतील, अशी आशा वांचीत बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलून दाखवली.
यावेळी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आंबेडकर आणि ठाकरे या नावाला मोठा इतिहास आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळातील वाईट प्रथांवर प्रहार केले. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरू आहे. देश हुकूमशाहीकडे चालला आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सर्व परंपरा आणि चाली मोडून आम्ही ‘देश प्रथम’ हा मुद्दा घेवून आम्ही एकत्र आलो आहोत.
सुभाष देसाई म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. आंबेडकर आणि ठाकरे यांच्यात दोन बैठकाही झाल्या. देशात एक वातावरण आहे. देश भरकटवण्याचं काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशाचा भवितव्याचा विचार करून दोन्ही नेत्यांनी एकत्र यायचं ठरवलं. संभाव्य संकट रोखण्यासाठी या दोन्ही शक्तींनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसा प्रस्तावही त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवला होता. आंबेडकर यांच्या या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये युतीची चर्चाही झाली. त्यानंतर जागा वाटप आणि किमान समान कार्यक्रमावर या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा झाली.
