fbpx

राणाप्रताप, चेतक स्पोर्ट्स व बदामी हौद संघ मुलांच्या गटातून उपांत्य फेरीत

जिल्हास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा : भैरवनाथ, अभिजीतदादा कदम संघ पराभूत

पुणे : बदामी हौद संघाने भैरवनाथ कबड्डी संघाला, राणा प्रताप संघाने अभिजीतदादा कदम संघाला तर चेतक स्पोर्ट्स संघाने भैरवनाथ क्रीडा संस्था भोसरी संघाला पराभूत करताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुणे अमच्युअर्स संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या गटाच्या कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

नेहरू स्टेडीयम येथे सुरु असलेल्या स्पर्धेत मुलांच्या गटातून बदामी हौद संघाने भैरवनाथ कबड्डी संघाला २१-१५ असे सहा गुणांनी पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला बदामी हौद संघाने १०-८ अशी 2 गुणांची आघाडी घेतली होती. बदामी हौद संघाकडून आकाश दिसले, राजेश बोराडे व शफिक शेख यांनी तर पराभूत संघाकडून सुनील लांडे, हर्षद माने यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले.

मुलांच्या गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत राणाप्रताप संघाने अभिजितदादा कदम संघाला २७-१४ असे १३ गुणांनी पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला राणाप्रताप संघाने १२-५ अशीआघाडी घेतली होती. विजयी संघाकडून शुभम शेळके, संकेत शेळके यांनी चढाया तर सुशांत शेळके व योगेश माने यांनी पकडी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत संघाकडून सनथ मांडगे व प्रथमेश कुडले यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

मुलांच्या गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत चेतक स्पोर्ट्स बालेवाडी संघाने भैरवनाथ क्रीडा संस्था भोसरी संघाला ३५-१८ असे १७ गुणांनी पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला चेतक स्पोर्ट्स संघाने २२-४ अशी १८ गुणांची मोठी आघाडी घेतली होती. चेतक स्पोर्ट्स संघाकडून बालाजी जाधव व आशिष पाडळे यांनी चढाया करताना तर शार्दुल वाघमारे व ऋषी जाधव यांनी पकडी करताना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून निखील धावडे व विराज लांडगे यांनी संघाला पराभवापासून वाचविण्याचा प्रयत्न केला.

तत्पूर्वी, काल रात्री उशीरा झालेल्या लढतींमध्ये मुलांच्या गटाच्या लढतीमध्ये राणाप्रताप संघाने श्रीकृष्ण बाणेर संघाला २६-१८ असे पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला राणाप्रताप संघाने १३-१२ अशी एका गुणाची आघाडी घेतली होती. राणाप्रताप संघाकडून गौरव नवले, शुभम शेळके, हर्षल ढगे यांनी चढाया तर शैलेश पाटील याने पकडी करताना संघाला विजय मिळवून दिला. श्रीकृष्ण संघाकडून निखील मुरकुटे, वैभव महाजन यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले.

अभिजीतदादा कदम संघाने सतेज बाणेर संघाला १८-७ असे पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला अभिजितदादा कदम संघाने ११-२ अशी आघाडी घेतली होती. विजयी संघाकडून प्रथमेश कुडले, सनथ मांडगे, विशाल पारिट, आदित्य शेळके यांनी तर पराभूत संघाकडून चन्नू शहाबादे व ओंकार रणपिसे यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन संघाने जयनाथ कबड्डी संघाला २०-१० असे, शिवाजी उदय मंडळ चिंचवड संघाने बाणेर युवा बाणेर संघाला ३०-१५ असे पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

—–

Leave a Reply

%d bloggers like this: