Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

पेशव्यांच्या समाधीस्थळी २६२ दीप प्रज्वलित करुन पुणेकरांची पानिपतवीरांना मानवंदना

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… अशा घोषणा देत आणि मर्द आम्ही मराठे खरे… या गीताचे समूहगान करीत मराठा साम्राज्यातील पानिपत युद्धात वीरमरण प्राप्त झालेले सदाशिवराव भाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे, विविध सरदार, सैनिक अशा पानिपतवीरांना २६२ दीप प्रज्वलित करुन मानवंदना देण्यात आली.

इतिहास प्रेमी मंडळ आणि सेव्ह हेरिटेज तर्फे पानिपत रणसंग्रामाच्या २६२ व्या वर्षी पानिपत वीरांना मानवंदना या कार्यक्रमाचे आयोजन नदी पात्रातील श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीस्थळ परिसरात करण्यात आले होते. यावेळी पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवे, तुषार दामगुडे, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते. शेकडो पणत्यांनी पेशव्यांच्या समाधीचा परिसर उजळून निघाला होता.

मोहन शेटे म्हणाले, मराठा साम्राज्याचे सर्वात जास्त काळ म्हणजेच २१ वर्षे पंतप्रधान म्हणून श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी काम केले. याच काळात पानिपतचे युद्ध झाले. तंजावर ते पेशावर एकाच ध्वजाखाली असावे, हे शिवरायांचे स्वप्न पेशव्यांच्या काळात मराठयांनी पूर्ण केले. छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ एक व्यक्ती नाही, तर तो एक कधीही न संपणारा विचार आहे.

ते पुढे म्हणाले, एकत्र येणे हे हिंदूंना जमले नाही, हे आपण पानिपत युद्धाच्या वेळी पाहिले. मराठयांनी फक्त महाराष्ट्राचे नाही, तर भारताचे रक्षण केले आहे. त्यासाठीच मराठे पानिपत युद्धाकरिता उत्तरेत गेले होते. पानिपतच्या युद्धानंतर सन १७६१ नंतर खैबरखिंडीतून हिंदुस्थानात येण्याची कोणाची हिंमत झाली नाही, हे मराठयांच्या कडव्या झुंजीचे यश आहे. आपला इतिहास हा पराक्रमाचा व तेजस्वी आहे. देशाचा विचार पहिल्यांदा करणे, हा संदेश पानिपतमध्ये मराठयांनी दिला आहे. अशा योद्ध्यांचे आपण स्मरण करायला हवे.

तुषार दामगुडे म्हणाले, पानिपत संपले असले तरी लढाई संपली नाही. दुर्जनशक्तींशी लढण्यासाठी सज्जनशक्ती संघटित होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. स्वप्नील नहार यांनी प्रास्ताविक केले. प्रणव सदरजोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading