fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

युद्धात, शांततेत एकत्र आलो नाही तर आपली मोठी हानी भारतीय नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार (निवृत्त)

पुणे : जगातील सर्वात मोठे युद्ध पानिपतमध्ये झाले. खरे तर एका दृष्टीने पाहिल्यास मराठे हरले नाहीत. मात्र, युद्धात व शांततेत आपण एकत्र आलो नाही, तर खूप मोठी हानी होते. हे आपण पानिपत, ब्रिटीश यांच्यासोबत लढताना पाहिले आहे. अनेक मराठा वीर आजही देशाच्या सिमेवर देशरक्षणासाठी पहारा देत आहेत. त्यामुळे इतिहासातील व आज देशरक्षणार्थ लढणा-या प्रत्येकाचे स्मरण आपण ठेवायला हवे, असे मत भारतीय नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे मराठा शौर्य दिनानिमित्त पानिपत वीरांना शौर्यवंदना देण्याकरीता लालमहाल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुरलीधर पवार, कात्रज दूध संघाच्या चेअरमन केशर पवार, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांची अष्टधान्यतुला करण्यात आली. कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, मेजर जनरल (निवृत्त) डॉ. विजय पवार, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार यांसह महाराष्ट्रातील पदाधिकारी व पवार घराण्यातील बांधव आणि भगिनी उपस्थित होते. यावेळी दिनदर्शिकेचे प्रकाशनही झाले.

कार्यक्रमात विक्रांत पवार, आशिष पवार, अ‍ॅड.रोहिणी पवार यांना धार पवार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरुप होते. शस्त्रपूजन, ध्वजपूजन, दीपोत्सव आदी विविध कार्यक्रमाद्वारे पानिपतवीरांना अभिवादन करण्यात आले. पानिपत ही मराठयांची व्यथा नाही, तर आमची शौर्यगाथा आहे, असे अभिमानाने सांगत पानिपत युद्धातील वीरांना व पानिपतवीर श्रीमंत महाराजा यशवंतराव पवार यांच्या वंशजांनी नमन केले.

डॉ.विजय पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये नेतृत्व आणि उत्तम रणनिती आखण्यासारखे महत्वाचे गुण होते. नेतृत्व करणारी व्यक्ती तेजस्वी, चपळ, जागरुक, निर्णयक्षमता, विश्वासहर्ता, चिकाटी, उत्साही असायला हवी. प्रत्येक गुणाचे महत्व वेगळे असते. शिवरायांसारखे हे गुण आपल्या आजच्या पिढीमध्ये असायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

पांडुरंग बलकवडे म्हणाले, हिंदुस्थानच्या रक्षणासाठी १ लाखाहून अधिक मराठयांनी पानिपतमध्ये बलिदान दिले. मराठयांनी लाहोर, पेशावर, अटक पर्यंताचा प्रदेश जिंकला, हे शालेय इतिहासात सांगितले जात नाही. तब्बल २३ वर्षे मराठयांनी हिंदुस्थानचे रक्षण केले. शिवरायांनी मराठयांना दिलेले कर्तव्य पार पाडताना, हिंदुस्थानचे रक्षण हे आपले कर्तव्य ही भावना प्रत्येकाच्या मनात होती.

सागर पवार म्हणाले, मराठयांनी केवळ मराठी साम्राज्यासाठी नव्हे, तर राष्ट्राच्या रक्षणासाठी जीवन समर्पित केले. मराठी मातीतील मुलांकडे हा राष्ट्रनिष्ठेचा संस्कार वारश्यानेच आला आहे. सन १७२६ पासून उदयाला आलेल्या यशवंतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोहिमा आखत भगवा झेंडा अटकेपार नेण्याकरीता लढा देण्यात आला. याबद्दल त्यांना सवाई असा बहुमान देखील मिळाला. उदगीर येथील लढाईत पवार यांनी मोठा पराक्रम गाजविला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading