Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

दत्तमहाराजांना १२५ किलो तिळगूळ आणि हलव्याच्या दागिन्यांचा महानैवेद्य

पुणे : तिळगूळ, गूळ पोळी, तिळ वडी, पापडी, गूळ मोदकाच्या तोरणांनी सजलेले दत्तमंदिर… हलव्याचा नयनरम्य तन्मणी, मुकुट आणि सुबक असा हलव्याचा हार घातल्यानंतर दिसणारी दत्तमहाराजांची विलोभनीय मूर्ती पाहण्याकरीता दत्तमंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली. मकरसंक्रांतीनिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमहाराजांना १२५ किलो गूळ, तिळगूळ आणि हलव्याच्या दागिन्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांसह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. रेखा गाडगीळ यांनी दत्तमहाराजांसाठी हलव्याचे दागिने साकारले. काशी येथील पं.वेदमूर्ती गणेश्वर द्रविडशास्त्री यांच्या हस्ते माध्यान्ह आरती झाली.

अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, मकरसंक्रातीनिमित्त १२१ किलो गूळ, ५ किलो तीळ, २५ किलो हलवा, गूळ पोळी, तिळ वडी, पापडी, मोदक, गुळाच्या ढेपी वापरुन सुभाष सरपाले यांनी ही आरास केली. ट्रस्टच्या १२५ व्या वर्षानिमित्त १२५ किलो साहित्य वापरुन ही आरास साकारण्यात आली आहे. मकरसंक्रांतीनिमित्त दाखविलेला तिळगूळ भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे. सोमवार, दिनांक १६ जानेवारी रात्रीपर्यंत ही आरास भाविकांना पाहण्याकरीता खुली राहणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading