महाराष्ट्र पोलीस दल देशात सर्वोत्तम – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिले जाते. राज्यात पोलीस दलाकडून उत्तम प्रकारे कायदा व सुव्यवस्था राखली जात असल्याने राज्य प्रगतीकडे जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य राखीव पोलीस बल क्र.२ मैदान वानवडी येथे आयोजित ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, मेघना बोर्डीकर साकोरे, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस महासंचालक तथा गृह रक्षक दलाचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय, प्रशिक्षण विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार, अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंग, पुणे शहरचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद आदी उपस्थित होते.
अनेक चांगल्या परंपरा महाराष्ट्राच्या पोलीस दलाने कायम केल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यासह लोकशाहीची मुल्ये जपण्याकरिता पोलीस दल कार्यरत आहे. विपरीत परिस्थितीत पोलीस कर्मचारी काम करतात. पोलिसांनी कोरोना काळात जीवनाची जोखीम पत्करून प्रचंड काम केले. त्यादरम्यान काही पोलिसांना शहीद व्हावे लागले. अशाही परिस्थितीत सामान्य माणसाचे जीवन सुकर व्हावे यासाठी पोलीस दलाने काम केले, असेही ते म्हणाले.
पोलीस दलासाठी पुणे येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल
२०१९ मध्ये पुण्यात पोलीस दलातील खेळाडूंसाठी चांगले क्रीडा संकुल तयार करण्याचा मनोदय पोलीस महासंचालकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार पोलीस विभागाकडून अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल. बालेवाडी येथे खेळासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. पण पोलिसांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यादृष्टीने पायाभूत सुविधांची याठिकाणी व्यवस्था करण्यात येईल.
पोलीस दलातील खेळाडू देशाचे नाव मोठे करतात
उपमुख्यमंत्री म्हणाले, पोलीस दलातील क्रीडापटूंसाठी या स्पर्धा महत्त्वाच्या असून त्यातून क्रीडा गुणांना वाव मिळतो आणि राष्ट्रीय स्पर्धेतही आपले क्रीडाकौशल्य दाखविण्याची संधी मिळते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी पदके मिळवतात, देशाचे नाव मोठे करण्याचे काम करतात. अशा खेळाडूंना वाव देण्यासाठी या स्पर्धांना महत्त्व आहे.
