माणूसपण जीवंत ठेवण्यासाठी कुटुंबाचा परिघ विस्तारा : गिरीजा गोडबोले
पुणे : सुबत्ता प्राप्त झाली की कुटुंब म्हणजे आपले एक स्वतंत्र बेट अशी अवस्था आज समाजात दिसून येते. माणूसपण जीवंत ठेवायचे असेल तर कुटुंबाचा परिघ विस्तारला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ती आदिवासी बांधवांकरिता स्वत:चे आयुष्य झोकून देऊन मोलाचे कार्य करणाऱ्या गिरीजा गोडबोले यांनी. तर दुसरीकडे आयुष्यात अपयश आले तरी घाबरण्याचे कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी दूरदृष्टी ठेऊन कार्य करा, असा सल्ला धडाडीचे तरुण, तडफदार युवा उद्योजक सागर बाबर यांनी दिला.
निमित्त होते आडकर फौंडेशन आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आयोजित ‘नकाराला भिडताना’ या अनोख्या कार्यक्रमाचे.. गिरीजा गोडबोले आणि सागर बाबर यांचा जिद्दिचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडला. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी गोडबोले आणि बाबर यांच्याशी संवाद साधला.
शालेय जीवनातील अपयश, नोकरीसाठी करावी लागलेली खटपट या विषयी माहिती देऊन बाबर म्हणाले, आवडीचे काम मिळणे हे प्रत्येक तरुणाचे ध्येय असते. मीही याच वाटेने जाण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांच्या साथीने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
समाजघटकांसाठी काम करण्याचे संचित कुटुंबाकडूनच मिळाल्याचे अभिमानाने सांगताना गोडबोले म्हणाल्या, इतरांना मदत करणे हा लहानपणापासून जगण्याचा भाग झाला होता. कुटुंबातील पुरुषांमुळे महिलांना नवी वाट निवडण्याची संधी मिळत नाही, पण मला मिळाल्याने ती मी आनंदाने स्वीकारली. कातकरी कुटुंबातील पुरुषांची दारू सोडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही घटकांकडून विरोध झाल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
बाबर म्हणाले, बालपण जुन्नर परिसरात गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जसा प्रभाव होता त्याच प्रमाणे गडकिल्ल्यांकडे बघून प्रेरणाही मिळाली. महाराजांविषयीची अनेक पुस्तके वाचल्याने जे उत्तम संस्कार झाले ते वेगळ्या वाटेवर प्रवास सुरू केल्यानंतर उपयोगी पडले. महाराजांविषयी अनेक पुस्तके आली पण महारांजमधील नेतृत्वगुणावर फारसे कुठे वाचायला मिळाले नाही. महाराज महाराष्ट्राबाहेरील तसेच देशाबाहेरील लोकांना समजण्यासाठी पुस्तक लिहिणार आहे.
ग्रामीण भागात काम करण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे सांगून गोडबोले म्हणाल्या, मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आजही गंभीर आहे. एका गावातून दुसऱ्या गावात मुलगी शिक्षणासाठी गेली तर ती सुरक्षितपणे परत येईल की नाही याची शाश्वती पालकांना आजही नाही. मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने काम करण्याची आवश्यकता आहे.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नॅचरोपॅथी सेंटर सुरू करण्याचा मनोदय बाबर यांनी या वेळी व्यक्त केला. आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, खेळ खेळा, स्वत:शी प्रामाणिक राहा असा संदेशही मुलाखती अखेर त्यांनी दिला.
सर्वप्रथम स्वत:ला माणूस म्हणून घडवा, मदतीचा स्थायीभाव जीवंत ठेवा आणि कंफर्ट झोनमधून बाहेर पडा असे आवाहन गोडबोले यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.
