राज्यच्या काही भागात अवकाळी पाऊस; शेतीला फटका
मुंबई : राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामानात सध्या पाऊस आणि थंडीचा खेळ आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रासह उत्तर मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे
त्यामुळे आता शेतक-यांचे हातातोंडाशी आलेले रबी पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या तूर, हरभरा, गहू या पिकांवर संकट उभे आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण होतेच. आता या अवकाळी पावसामुळे तूर, हरभरा, कांदा अशी पिके धोक्यात आली आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव, नांदुरा, शेगाव येथे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. तर भंडारा, गोंदियात झालेल्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांना फटका बसला आहे.
उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी पारा चांगलाच घसरला आहे. थंडीचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दुसरीकडे मराठवाड्यात देखील गारठा वाढला आहे. तसेच मुंबईचे किमान तापमान १५अंशावर गेले आहे. त्यामुळे मुंबईतही थंडी वाढली आहे. तर थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या माथेरानचे किमान तापमान १८ अंश आहे. मुंबईत सध्या माथेरानपेक्षाही अधिक थंडी वाजत आहे.
जळगाव जिल्हा उच्च तापमानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात मोठी घट झाली आहे. तापमानाचा पारा ९ अंशावर गेला आहे. जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. उत्तर महाराष्ट्रासह उत्तर मराठवाड्यात गारठा चांगलाच वाढला आहे. पुढील दोन दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथे ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. तर मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात त्यामुळे किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होऊन थंडीचे प्रमाण कमी जाणवते. मुंबईसह कोकणात मात्र वातावरणात विशेष बदल जाणवणार नसून थंडीचा प्रभाव तिथे कायम असल्याची माहिती खुळे यांनी दिली. दरम्यान अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्या ठिकाणच्या रबी पिकांना या पावसाचा फटका बसला आहे.
नागपुरातही आज, गुरुवारी तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच थोडेफार ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
दाट धुक्यामुळे बुधवारी पहाटे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने दोन विमाने उशिराने दाखल झाली. पुणे, इंदूर आणि हैदराबाद येथून येणारे विमानही धुक्यामुळे उशिराने आल्याची माहिती आहे. रायपूर येथे जाणारे दिल्ली येथून निघालेले विमान नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. रायपूर येथे धुके अधिक असल्याने वैमानिकाला नागपूर विमानतळावर विमान उतरवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
