सेन्सॉर चा दणका : ‘पठाण’मध्ये झाले मोठे बदल
मुंबई : शाहरूख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पठाण’ मधील . ‘बेशरम रंग’ हे पहिले गाणे रिलीज झाल्यानंतर वादही पेटला. या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या बिकिनीच्या रंगावर सर्वसामान्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत आक्षेप घेण्यात आले असून त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे म्हटले आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांचेही विधान आले की, ‘पठाण’मध्ये सेन्सॉरच्या नियमानुसार बदल करण्यात आले आहेत.
दरम्यान सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार चित्रपटात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. तसेच ‘बेशरम रंग’ या गाण्यात देखील बदल करण्यात आले आहेत, चित्रपटातील संवादांमध्येही अनेक शब्द बदलण्यात आले आहेत.
‘पठाण’च्या ‘बेशरम रंग’ या गाण्यात किमान तीन मोठे बदल समोर येत आहेत. रिपोर्टनुसार, ‘बेशरम रंग’मध्ये दीपिकाच्या शरीराचे काही क्लोज-अप शॉट्स काढण्यात आले आहेत. तसेच, गाण्यातील ‘बहुत तंग किया’ या गाण्यांसोबत असलेले काही व्हिज्युअल देखील बदलण्यात आले आहेत आणि त्याऐवजी इतर शॉट्स वापरण्यात आले आहेत.
‘बेशरम रंग’मधून दीपिकाची साईड पोजही काढून टाकण्यात आली आहे. या गाण्यातील दीपिकाच्या वादग्रस्त ‘केशरी रंगाच्या बिकिनी’चे शॉट्स अजूनही आहेत की काढून टाकण्यात आले आहेत याची माहिती समोर आलेली नाही. सेन्सॉर बोर्डाने ‘पठाण’च्या निर्मात्यांना ‘यू/ए’ रेटिंग दिले आहे.
चित्रपटाचे किती सेकंदांचे फुटेज सेन्सॉर करण्यात आले आहे याबद्दल तपशील समोर आलेला नाही, परंतु आता चित्रपटाचा रनटाईम १४६ मिनिटांचा म्हणजेच २ तास २६ मिनिटांचा झाला आहे. शाहरूखचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
