केंद्र सरकारने सहकारी बँकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे – शरद पवार
दि विश्वेश्वर सहकारी बँक लि. पुणे यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आज टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न झाला त्यावेळी पवार बोलत होते. बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत बँकेच्या ५० वर्षांची वाटचाल दर्शविणा-या गौरविकेचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. याबरोबरच रिझर्व्ह बँकेने दि विश्वेश्वर बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेला नुकतीच परवानगी दिली, या सेवेचे उद्घाटन देखील पवार यांनी केले.
डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर, सहकार व बँकिंग विषयाचे तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, बँकेचे अध्यक्ष सुनील रुकारी, बँकेच्या सुवर्ण महोत्सवी समितीचे कार्याध्यक्ष अनिल गाडवे, उपाध्यक्ष अजय डोईजड, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे, गौरविकेचे संपादक विद्याधर ताठे, माजी आमदार उल्हास पवार, बँकेचे संचालक दत्तात्रय कामठे, सुभाष लडगे आणि बापूसाहेब धनकवडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
देशातील सहकारी बँकांची संख्या ही १,५१४ इतकी असून यामध्ये महाराष्ट्र क्रमांक एक, गुजरात हे क्रमांक दोन तर कर्नाटक राज्य हे तिस-या स्थानावर आहे असे सांगत पवार पुढे म्हणाले की, “आज सहकार क्षेत्रातील बॅंकांमध्ये घोटाळे होण्याचे प्रमाण पाहता ते अत्यल्प अर्थात ०.४३ इतके असल्याने याच बॅंकांमध्ये घोटाळे होतात हा समज चुकीचा आहे हे सांगण्यासाठी ही आकडेवारी महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचविण्याचे काम प्रामुख्याने सहकारी बॅंका करतात ही बाब आता अधोरेखित झाली आहे.”
महाराष्ट्र राज्याचा देशातील सहकार क्षेत्रातील वाटा हा मोठा असून मुंबई इलाखा असल्यापासून वैकुंठराव मेहता, धनंजय गाडगीळ, यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांसारख्या दिग्गजांचे यामध्ये मोलाचे योगदान आहे. संकटांच्या काळात सहकारी बँका मदतीसाठी पुढे येतात आणि म्हणूनच त्यांच्याकडे सरकारने सहानुभतीपूर्वक दृष्टीकोनाने पहायला हवे, असेही पवार यांनी नमूद केले.
कोणत्याही बँकेची स्थिती चांगली की वाईट हे समजण्यासाठी त्याचा निव्वळ एनपीए किती हे पहावा. ही त्या बँकेची नाडी परीक्षा म्हणता येईल. दि विश्वेश्वर सहकारी बँकेचा हा निव्वळ एनपीए १.३४ टक्के इतका कमी आहे यामध्ये संचालक मंडळ, भागीदार, खातेदार व ग्राहक यांचा महत्त्वाचा वाटा आहे असे सांगत पवारांनी दि विश्वेश्वर बँकेचे कौतुक केले.
सहकार हा सामान्य नागरिकांच्या व ग्राहकांच्या प्रगतीचा मार्ग आहे, असे सांगत विद्याधर अनास्कर म्हणाले, “नुकतीच रिझर्व्ह बँकेने सुरक्षित व विश्वासार्ह्य बँकांची यादी जाहीर केली मात्र या दोन्ही बाबी या खातेदार, ग्राहक व जनतेला समोर ठेवत यायला हव्यात. आज देशातील सहकार क्षेत्राचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र त्यातही पुण्यातील दि विश्वेश्वर बँकच योग्य आहे असे मला वाटते. नुकतीच इंटरनेट सुविधा देणा-या रिझर्व्ह बँकेच्या इंस्पेक्टिंग अॅथॉरिटीने दि विश्वेश्वर बँकेचे कौतुक केले आहे आणि ही गोष्ट गौरवास्पद आहे.”
देशामध्ये नागरी सहकारी बॅंकांमध्ये तब्बल ५ लाख २६ हजार कोटी रुपये इतकी रक्कम आहे त्यापैकी ३ लाख ६१ हजार कोटी म्हणजे ६१ टक्के फक्त महाराष्ट्रात आहे. नागरी सहकारी बँकांमध्ये सहकारी चळवळ टिकवण्याची जबाबदारी ही दि विश्वेश्वर बँकेसारख्या सहकारी बॅंकांकडे आहे असेही त्यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी आपण चांगल्या गोष्टीची अपेक्षा करतो तिथे मनाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाते. आज समाज आध्यात्मिक व धार्मिकता टाळत असला तरी जेव्हा या संदर्भातील नाव एखाद्या व्यवसायाला येते तेव्हा त्या ठिकाणी सगळं नीट सुरू आहे असा विश्वास मिळतो, असे गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार अनिल गाडवे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, सुनील रुकरी यांनी प्रास्ताविक केले तर श्रीनिवास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
