ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत हे मराठी वाड्.मयाचे वेद -ज्येष्ठ प्रवचनकार मोहना चितळे यांचे मत
पुणे : शांती अनुभवयाची असेल तर ज्ञानेश्वरीच्या सहवासात जावे, भक्तीचे वैभव अनुभवायचे असेल तर तुकोबारायांची गाथा वाचावी, ज्ञान आणि शांती दोन्हीचा अनुभव घ्यायचा असेल तर एकनाथी भागवत पहा आणि प्रपंच व परमार्थ दोन्ही युक्तीने साधायाचा असेल तर ग्रंथराज दासबोधाच्या सहवासात जावे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या चार ग्रंथांना जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व मराठी माणसाच्या दृष्टीने ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम महाराजांची गाथा आणि एकनाथी भागवताला आहे, असे मत ज्येष्ठ प्रवचनकार मोहना चितळे यांनी व्यक्त केले.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्या वतीने तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात दासबोध सप्ताह प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. मोहना चितळे यांनी उपस्थितांना ग्रंथराज दासबोधातील भक्ती मार्ग या विषयावर निरुपण केले.
मोहना चितळे म्हणाल्या, दासबोध ग्रंथात काय मांडले आहे हे सुरूवातीलाच समर्थांनी सांगितले आहे. प्रभुरामचंद्र यांना याची देह याची डोळा अनुभवयाचे असेल तर भक्ती हा राज मार्ग आहे. भक्ती हे शास्त्र आहे. नारद भक्ती सूत्र आणि शाण्डिल्य सूत्रात देखील भक्तीला शास्त्र म्हणून संबोधले आहे. ज्ञानोत्तर भक्ती किंवा अभेद भक्ती पर्यंत पोहोचण्यासाठीची उपासना, यालाही समर्थ भक्ती म्हणून संबोधतात. केवळ श्रवण, कीर्तन, पादसेवन म्हणजे भक्ती नाही. तर भक्ती म्हणजे समग्रता, असेही त्यांनी सांगितले.
