Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात शनिवारी नुक्कड साहित्य संमेलन तर रविवारी बालसाहित्य संमेलन


पुणे : विवेक साहित्य मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 7 जानेवारी रोजी नुक्कड साहित्य संमेलन तर रविवार, दि. 8 जानेवारी रोजी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नुक्कड साहित्य संमेलनाचे यंदाचे सहावे तर बालसाहित्य संमेलनाचे पहिलेच वर्ष आहे. संमेलनामध्ये प्रसिद्ध साहित्यिक आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत.
नुक्कड साहित्य संमेलनात साहित्यकेंद्रीत कार्यक्रम आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे तर मुलांना केंद्रस्थानी ठेवून तसेच मुलांचा अधिकाधिक सहभाग असावा या उद्देशाने बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विवेक साहित्य मंचच्या संयोजक डॉ. अर्चना कुडतरकर, बालसाहित्यकार राजीव तांबे आणि प्रा. डॉ. आनंद काटीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. प्रसिद्ध कथाकार जी. ए. कुलकर्णी, लेखक, साहित्य समीक्षक गंगाधर गाडगीळ, लेखक शांताराम (के. ज. पुरोहित) आणि आत्मकथन लिहिणाऱ्या पहिल्या दलित स्त्री लेखिका शांताबाई कांबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असल्याने या साहित्यिकांना संमेलन समर्पित करण्यात आले आहे.
नुक्कड आणि बालसाहित्य संमेलन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन शनिवारी (दि. 7) सकाळी 9 वाजता संत साहित्याचे अभ्यासक, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार असून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शरद कुंटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांचे उद्घाटन सत्रात बीजभाषण होणार आहे.
सकाळी 10:30 वाजता ‘कोरीव लेणी’ हा परिसंवाद आयोजित करण्यात आला असून जी.एं.च कथालेखन या विषयावर डॉ. संजीव कुलकर्णी तर जी.एं.च पत्रलेखन या विषयावर महेश आफळे बोलणार आहेत. डॉ. आनंद काटीकर अध्यक्ष असतील. सकाळी 11:15 वाजता ‘नवकथेचे शिल्पकार गंगाधर गाडगीळ’ हा परिसंवाद आयोजित करण्यात आला असून डॉ. निर्मोही फडके या कथालेखन तर डॉ. रुपाली शिंदे या कादंबरी विषयांवर बोलणार आहेत. ‘कथा शांतारामांच्या, विषय वैविध्याचा’ या सत्रात डॉ. राजेंद्र नाईकवाडे कथालेखन तर डॉ. सुजाता शेणई ललित बंध आणि समीक्षा या विषयावर मतप्रदर्शन करणार आहेत. दोन्ही सत्रांच्या अध्यक्षस्थानी डॉ. नीलिमा गुंडी असणार आहेत.
दुपारी 12:10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या नुक्कड कथा अभिवाचनात अभय नवाथे, नेहा लिमये, ईशा महल्ले, उमेश पटवर्धन, श्रीया बर्वे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 1:30 ते 3:10 या वेळात ‘कविता, सादरीकरण आणि बरंच काही’ हे सत्र आयोजित करण्यात आले असून कवितेतील सामाजिकता या विषयावर रमेश वाकनीस आणि कवितेतलं विषयवैविध्य या विषयावर एल.बी. पाटील बोलणार आहेत. कवी प्रवीण दवणे अध्यक्ष असतील. त्यानंतर नवोदित कवींचे सादरीकरण होणार असून अध्यक्षस्थानी काव्य-शिल्प संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जोशी असणार आहेत. दुपारी 3:20 ते सायंकाळी 5 या वेळात ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ हा दीर्घांक आयोजित करण्यात आला असून मुक्ता आशा, मंजू गौतम सादरीकरण करणार आहेत. दिग्दर्शन योगेश सोमण यांचे आहे. या दीर्घांकावर दीपाली दातार बोलणार आहेत. पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात साहित्य अकामदी पुरस्कार प्राप्त युवा लेखक प्रणव सखदेव यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (दि. 8) आयोजित करण्यात आलेल्या बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका व गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता होणार असून प्रसिद्ध चित्रकार रवींद्र देव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी 10:50 वाजता ‘ऐकताय ना माझी कविता’ हे मुलांचे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले असून अध्यक्षस्थानी आश्लेषा महाजन असणार आहेत. सकाळी 11:15 वाजता रंगभाषातर्फे ‘बखर बिम्मची’ हे नाट्यसादरीकरण होणार आहे.
दुपारी 1:30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या ‘बोलू चित्रांशी-रंगांशी’ या सत्रात गिरीश सहस्त्रबुद्धे आणि राजीव तांबे मुलांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 2:10 ते 3:00 या वेळात मुलांचे नाट्यछटा आणि एकपात्रिका सादरीकरण होणार आहे. ‘ऐकू या छान छान गोष्टी’ या दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आलेल्या सत्रात नीलिमा गुंडी आणि धनंजय गुडसुरकर मुलांशी गोष्टींविषयी हितगुज करणार आहेत. दुपारी 3:40 वाजता मकरंद जोशी ‘निसर्गातील सखे-सोबती’ या विषयावर बोलणार आहेत. दुपारी 4:10 वाजता योगेश सोमण दिग्दर्शित ‘द प्लॅन’ हे नाटक सादर केले जाणार आहे. बालसाहित्य संमेलनाच्या अखेरच्या सत्रात विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading