Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्य लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षांचे नियोजन करावे : डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी विशेष लक्ष द्यावे. आयोग आयोजित करीत असलेल्या विविध परीक्षा आणि त्यांचे लावले जाणारे निकाल यांचा कालावधीमध्ये ताळमेळ राखला जावा. २०२१ च्या राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखती लवकर घेऊन निकाल ही लवकर लावावा. कोविड काळात परीक्षा न घेता आल्याने विद्यार्थ्याना वाढीव कालावधी मिळाला आहे. यामध्ये किती विद्यार्थ्याना याचा लाभ घेता आला याची माहिती सादर करा, असे निर्देश आज विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आयोगास आज दिले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावर आज हिवाळी अधिवेशनात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे, आ. वजाहत मिर्झा, कॉँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, उपसभापती कार्यालयाचे खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर आदी या बैठकीला उपस्थित होते. तर लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी हे दुरदृश्य प्रणालीदवारे उपस्थित होते.

अतुल लोंढे यांनी, ‘लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये अभ्यासक्रमात सुसूत्रता असावी याकडे लक्ष वेधले. तसेच वन विभाग, कृषि विभागासाठीच्या परीक्षांचा सुधारीत अभ्यासक्रम लवकरात लवकर प्रसिद्ध करावा’ अशी मागणी केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर वेळापत्रक आणि अभ्यासक्रमात नियमितता व निश्चित वेळापत्रक असावे असे मुद्दे मांडले.

नितीन गद्रे यांनी सांगितले की, राज्य शासनाची भूमिका ही विद्यार्थ्यांच्या हिताचीच राहणार आहे. लोकसेवा आयोग ही स्वायत्त संस्था आहे. श्रीमती डॉ खरात सचिव लोकसेवा आयोग यांनी सांगितले की लोकसेवा आयोगाच्या विविध मुद्यांवर लोकसेवा आयोगाने माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. सदर त्रिसदस्यीय समितीचा अहवाल लोकसेवा आयोगाने स्वीकारला आहे व त्याची २०२३ पासून याच्या शिफारशींची अंमलबजावणी लोकसेवा आयोग करणार आहे.

याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी स्वतः लक्ष घातले असून, या प्रश्नां संदर्भात आवश्यकता पडल्यास उच्च स्तरावर बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. पुणे शहरात या परीक्षांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून येत असल्याने आणि राज्याच्या ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असल्याने हा प्रश्न अधिक महत्वाचा असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading