आमदार बाळासाहेब थोरात यांना दुखापत; उपचारासाठी विमानाने मुंबईला रवाना
नागपूर : नागपूरयेथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. आज विधीमंडळात विरोधकांनी महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादचा प्रश्न लावून धरला. दरम्यान, काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात हे आज सकाळी भोवळ येवून खाली पडले. त्यामुळे त्यांना दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना ताबडतोब खाजगी विमानाने मुंबईला नेण्यात आले आहे.
आमदार बाळासाहेब थोरात यांना आज सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना भोवळ आली व त्यांचा तोल जाऊन ते पडले. त्यामुळे त्यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीसाठी मुंबई येथे नेण्यात आले.
याविषयी पीटीआयशी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, थोरात यांचा एक खांदा फ्रॅक्चर झाला असून त्यांना मुंबईला हलवण्यात आले आहे. त्यांचे पुण्यातील फॅमिली डॉक्टर हे मुंबईत दाखल होणार असून त्यांच्या सल्ल्यानुसार थोरात यांच्यावर पुढील उपचार केले जातील.