इतरांच्या सुखामध्ये सुख पाहणे हेच माणूसपण : प्रा.डॉ. स्वानंद पुंड
पुणे : माणसाचे जीवन हे अलौलिक आहे. माणूस म्हणजे नेमके काय हे चिंतन करावे लागणे हे माणूसपणातील वेगळेपण आहे. इतरांच्या सुखामध्ये सुख पाहणे, इतरांना आनंद देणे याला माणूस होणे म्हणतात. दु:खदायक वाटणाऱ्या गोष्टीतूनही आनंद घेता आला तर मोठे झालो असे समजण्यास हरकत नाही. साहित्य, संगीत आणि कला याचा जीवनात समावेश असणे हे माणसाचे वेगळेपण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गाणपत्य (गणेश उपासक) आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. स्वानंद पुंड यांनी केले.
नामवंत वक्त्यांचा सहभाग आणि सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच आरोग्य अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील सहजीवन व्याख्यानमालेस आज ‘माणूस तुझे नाव‘ या विषयावरील पुंड ंयांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सुरुवात झाली. व्याख्यानमालेचे यंदाचे 21वे वर्ष आहे. प्रतिवर्षाप्रमाणे व्याख्यानमालेस पहिल्या दिवसापासून श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पुंड यांच्यासह डॉ. राम साठे, उदय कुलकर्णी, राजेंद्र देव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
पुंड म्हणाले, निसर्गापेक्षा मोठा गुरू नाही आणि निरिक्षणापेक्षा मोठे शास्त्र नाही. माणसाच्या पोटाच्या वरील स्तरावर मन असते तर मनाच्या वरच्या स्तरावर बुद्धी असते हे माणसातील वेगळेपण आहे. पशु आणि मानव यांच्यातील भेद विषद करून ते पुढे म्हणाले, पशुपक्षांचे पोट आणि डोके एकाच पातळीवर असल्याने ते पोटापलिकडे जाऊन विचार करू शकत नाहीत, परंतु माणसाकडे बुद्धी, मन आणि हसण्याची कला असणे हे वेगळेपण आहे. कोणाचेही जीवन परिपूर्ण नसते, हसणे परिस्थितीवर अवलंबून नसते. पशु सुद्धा आहार, निद्रा, भय, मैथुन करू शकतात, पशुंना रडता येते पण माणसाला हसता येणे तसेच त्याच्या आयुष्यात काव्य, शास्त्र, विनोद, साहित्य संगीत, कला असणे हे त्याचे वेगळेपण आहे.
अध्यात्म स्वत:ला तपासायचे शास्त्र आहे. मी कसे वागावे हे माझ्याच हातात आहे. कुठे थांबायचे हे कळणे आवश्यक आहे. आनंदचा स्तर उंचावणे हा मोठे होण्याचा निकष आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याची काळजी केली तर ती चिंता होते आणि ही चिंता चितेवर जाईपर्यंत जाळत राहते.
माणसाच्या आयुष्यात बुद्धी शाश्वत आहे या बौद्धिक पातळीवर जेव्हा त्याला आनंद घेता येईल, तेव्हा तो मोठा झाला बुद्धिपतीपर्यंत पोहोचला असे समजण्यास हरकत नाही. माणसाला जीवनात ध्यास असणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीतून भरभरून आनंद देता–घेता येणे हे माणुसपणाचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले.