fbpx

अकॅडमिक क्रेडिट बँकसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

प्र- कुलगुरू संजीव सोनवणे यांची माहिती

पुणे : नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केली असून आतापर्यंत साडेचार लाख विद्यार्थ्यांनी अकॅडमिक क्रेडिट बँक साठी नोंदणी केली आहे. महाविद्यालयांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून शैक्षणिक धोरण समजून घेत अंमलबजावणी करावी असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर विद्यापीठ व महाविद्यालय पातळीवरील नोडल अधिकारी, संशोधक समन्वयक, प्राध्यापक यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.सोनवणे बोलत होते. यावेळी बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.आर.एस. माळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, राहुल पाखरे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ.संजय ढोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ.सोनवणे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्व सोयी सुविधा देऊ, मात्र ते समजाऊन घेत त्याची योग्य अंमलबजावणी करणे हे तुमच्याच हातात आहे, यासाठी कोणतीही अडचण आली तर ती सोडविण्यासाठी विद्यापीठ काम करेल पण असेही डॉ. सोनवणे यांनी उपस्थितांना सांगितले.

प्रसेनजीत फडणवीस म्हणाले, विद्यापीठाने गुणवत्ता सुधार उपक्रम राबविला असून त्या अंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी १६३ महाविद्यालयांचे प्रस्ताव आले होते त्या सर्वांना मान्यता दिली. तसेच नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने १६ विषय दिले होते. अधिसभा, व्यवस्थापन, विद्या परिषद आणि परीक्षा विभाग या सर्वांसोबत सेमिनार घेतले.

डॉ. ढोले यांनी सांगितले की, विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाबाबत जी समिती नेमली होती, त्या समितीने महाविद्यालयांपर्यंत धोरण पोहोचवणे, प्रशाकीयदृष्ट्या बदल करणे आणि शासनाशी समन्वय साधण्याबाबत अनेक चांगल्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

या कार्यशाळेचे सूत्रसंचलन डॉ.संजय चाकणे यांनी केले. या कार्यशाळेसाठी जवळपास दोनशे महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: