fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

…तर ‘पठाण’विरोधात आम्हीही आंदोलन करू –  रामदास आठवले

पुणे : “शाहरुख खानच्या पठाण सिनेमाला आमचा विरोध नाही. गौतम बुद्ध हे देखील भगवा रंग परिधान करायचे. जसा भगवा रंग भाजप, शिवसेनेचा आहे; तसाच आमचा पण रंग भगवा आहे. मात्र, गाण्यातील बेशरम हा शब्द काढला पाहिजे. कोणताही रंग बेशरम नसतो. बेशरम शब्द काढला नाही, तर आम्हीही आंदोलन करू,” असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.

पुण्यातील नवीन विश्रामगृहात आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी ‘रिपाइं’ शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, ‘रिपाइं’ नेते परशुराम वाडेकर, प्रदेश उपाध्यक्ष असित गांगुर्डे, महिपाल वाघमारे, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, संजय सोनवणे, विशाल शेवाळे, मोहन जगताप, बसवराज गायकवाड, निलेश आल्हाट, वीरेन साठे, यशवंत नडगम, शाम सदाफुले, राजेश गाडे, अक्षय गायकवाड, आनंद लवटे, वैभव पवार, महादेव साळवे, जयदेव रंधवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येतील. स्तंभाजवळ सभा घेता येणार नाही, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आमचा या निर्णयाला विरोध नाही. ज्यांना सभा घ्यायची ते आजुबाजूबाजूला घेऊ शकतात. याची परवानगी देण्यात यावी, याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत. तसेच विजयस्तंभ प्रकरणी दाखल केसेस मागे घ्याव्यात, अशी आमची मागणी आहे.”

संविधानाने भारत जोडलेला

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान देऊन भारत देश जोडलेला आहे. काँग्रेसने जाती-पातीचे राजकारण करून देश तोडण्याचा प्रयत्न केला. आज पुन्हा राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेतून देश जोडण्याबाबत सांगत आहे. संविधान धोक्यात असल्याचा समज पसरवत आहेत. पण कोणीही संविधान बदलू शकत नाही. त्यामुळे मोदी सरकारकडून संविधान बदलले जात असल्याचा अपप्रचार विरोधकांनी थांबवायला हवा. मोदी संविधान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असल्यानेच रिपब्लिकन पक्ष मोदींसोबत आहे,” असे रामदास आठवले यांनी नमूद केले.

महापुरुषांचा सन्मान ठेवावा

आठवले पुढे म्हणाले, “पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चुकीची भाषा वापरली. मात्र, त्यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. शाईफेक प्रकरणातील तरुणांना जामीन झालेला आहे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक ताणला जाऊ नये. सर्वांनी शांतता पाळावी आणि महापुरुषांचा सन्मान ठेवावा. हे सर्वच महापुरुष अनेक पिढ्यासाठी आदर्श राहणार आहेत. महाविकास आघाडीने काढलेला मोर्चा फार मोठा नव्हता. आमदार सांभाळता न आल्याने मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. राज्यपालांच्या संदर्भात भाजप नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली आहे.”

समान नागरी कायद्याला पाठिंबा

रिपब्लिकन पक्षाचा समान नागरी कायद्याला पाठिंबा आहे. हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. तसेच या कायद्यामुळे आरक्षणाला कोणताही धोका नाही. लोकसंख्या नियंत्रणासाठी हा कायदा महत्वाचा आहे. आरक्षण जाणार असेल, तर आवाज उठवू, असेही आठवले यांनी सांगितले.

शैलेंद्र चव्हाण यांनी स्वागत प्रास्ताविक केले व आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading