fbpx

समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक- पालकमंत्री चंद्रकांत  पाटील

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली आणि सहभागी बचत गटांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार उमा खापरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी महापौर माई ढोरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, महिला स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत समाजाच्या प्रगतीला मर्यादा आहेत. महिला बचत गटांना प्रशिक्षण आणि बाजार उपलब्ध करून दिल्यास ते अधिक सक्षमपणे काम करतील. बचत गटांनी नागरिकांची गरज ओळखून नवे उत्पादन आणि सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. बचतगटांना असे नवे प्रयोग करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असेही श्री.पाटील म्हणाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पवनाथडी यात्रेच्या माध्यमातून ४०० बचत गटांना चांगली संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगून अशा उपक्रमाद्वारे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळेल असे पालकमंत्री म्हणाले.

पवनाथडी यात्रेविषयी…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचतगट, वैयक्तिक महिला यांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात या हेतूने गवनाथडी जत्रेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या चटण्या, पापड, लोणची, जाम, जेली, विविध प्रकारचे मसाले, विविध गृहोपयोगी उत्पादने, दैनंदिन वापराच्या वस्तु, हस्तकला निर्मित उत्पादने यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचा समावेश विक्री स्टॉलमध्ये आहे. खवैय्यांना महिलांनी तयार केलेले चुलीवरचे वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, शाकाहारी मासवडी, खानदेशी पुरणाचे मांडे, झणझणीत चुलीवरचं मटण, खेकडा करी, कोंबडी वडे, दमबिर्याणी, कुरकुरीत मच्छी फ्राय अशा मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

जत्रेमध्ये नागरिकांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पवनाथडी जत्रेत एकूण ४०० इतकी स्टॉल आहेत, तर ५६० बचगटांनी यात्रेत सहभाग घेतला आहे. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीचे २४६ स्टॉल, महाराष्ट्रीयन मराठमोळ्या शाकाहारी पदार्थाचे १७७ स्टॉल, तर मांसाहारी पदार्थाचे १३७ स्टॉल यात्रेत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: