fbpx

राग मारवा, दादरा आणि संतुराच्या सुमधूर सुरांनी छेडल्या रसिकांच्या मनाच्या तारा

पुणे : हळूवारपणे खुलत गेलेला राग मारवा, त्यांनतर दादरा आणि भजनाच्या दमदार सादरीकरणाने रसिक भारावून गेले होते. त्यानंतर सादर झालेल्या बहारदार संतूर वादनाने रसिकांच्या मनाच्या तारा छेडल्या.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरवात कोलकातास्थित किराणा घराण्याच्या गायिका मनाली बोस यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मारवामध्ये एकतालात हळूवार सादरीकरणाने आपल्या गायनाची सुरवात केली. त्यानंतर ‘अब काहे सतावो जावो…’ हा गारा व पिलू रागातील मिश्र दादरा व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा लोकप्रिय भजन ‘ बाजे रे मुरलिया बाजे’ सादर केले. त्यांना अभिनय रवांदे ( हार्मोनियम ), पांडुरंग पवार (तबला), वीरेश संकाजे व वत्सल कपाळे ( तानपुरा) यांनी अतिशय समर्पक साथ केली.

याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना बोस म्हणाल्या, ” पुण्यात मी पहिल्यांदा गायन सादर करत आहे. सवाई’चा हा मंच प्रत्येक संगीत साधकांसाठी तीर्थासमान आहे. याठिकाणी मी आज पूजा करण्यासाठी बसले आहे. माझ्या कलेसाठी मला रसिकांचे आशीर्वाद लाभोत, अशी इच्छा आहे.”

बोस यांच्यानंतर पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र व प्रसिद्ध संतूरवादक राहुल शर्मा यांचे संतूरवादन झाले. सवाई’मध्ये कला सादर करताना कायम आनंद होतो. मी नेहमीच पुण्यातील श्रोत्यांसाठी वाजवतो,असे सांगत त्यांनी हंसध्वनी रागाने आपल्या सादरीकरणाची सुरूवात केली. त्यामध्ये मत ताल, नऊ मात्रा,आलाप, जोड, झाला आणि दृत तीन ताल सादर केला. मिश्र खमाज धूनमध्ये दादरा आणि तीनताल सादरीकरणाने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला.
त्यांना ओझस अढीया (तबला) यांनी अतिशय समर्पक साथ केली.

Leave a Reply

%d bloggers like this: