fbpx

रसिकांनी लुटला सुरेल गायन आणि बहारदार सरोदवादनाचा आनंद

पुणे  : किराणा घराण्याची सुरेल गायकी आणि मैहर सेनी घराण्याच्या बहारदार सरोदवादनाचा आनंद लुटत रसिकांनी अनुभविली संगीतमय संध्याकाळ.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात किराणा घराण्याचे दिल्ली स्थित गायक अविनाश कुमार यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग पुरीया धनाश्रीद्वारे त्यांनी आपल्या सादरीकरणास सुरूवात केली. त्यामध्ये हळूवार स्वरूपातील विलंबित एकताल बंदिशी त्यानंतर द्रुत तीन तालातील ‘पायलिया झंकार मोरी’ आणि एकतालातील बंदिश सादर केली. संत कबीर यांची रचना असलेल्या ‘मन मन फूला फूला फिरे जगत में’ या भजन सादरीकरणाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.

त्यांना अविनाश दिघे (हार्मोनियम) पांडुरंग पवार (तबला), आदर्श शर्मा व प्रणव कुमार ( तानपुरा) यांनी साथ केली. अविनाश कुमार यांनी यंदा प्रथमच सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात आपली कला सादर केली. यावेळी बोलताना कुमार म्हणाले, “तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट घडते, तेव्हा एखादे स्वप्न पूर्ण झाल्याप्रमाणे वाटते. आज सवाई’च्या मंचावर आपली कला सादर करताना मलाही माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पंडित श्रीनिवास जोशी आणि त्यांच्या पत्नी शिल्पा जोशी यांचा आभारी आहे. ”

त्यानंतर मैहर सेनी घराण्याचे सुप्रसिद्ध सरोदवादक आलम खाँ यांनी सरोदवादन झाले. त्यांनी आपले वडील महान सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मैहर  सेनी घराण्यातील प्रचलित अशा हिंडोल-हेम या मिश्र रागातील रचना सादर केल्या. सुरवातीला विलंबित गत’मध्ये हळूवारपणे या रागाची उकल करत, त्यांनंतर जलद स्वरूपात द्रुत गत सादरीकरणाद्वारे रसिकांची मने जिंकली.
राग मिश्र पिलूमध्ये रूपक तालातील गत सादर करत त्यांनी आपल्या वादनाची सांगता केली. त्यांना सत्यजित तळवलकर त्यांना तबल्यासाठी साथ केली.

कार्यक्रमात आलम खाँ यांचे वडील उस्ताद अली अकबर खाँ आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा देत आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी म्हणाले, ” माझे वडील आणि उस्तादजी यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोघांमधील समान दुवा म्हणजे दोघांनाही गाडी चालवण्याची प्रचंड आवड होती. त्यांच्याप्रमाणे पुढील पुढील पिढीतही हा जिव्हाळा कायम राहील, असा मला विश्वास आहे.”

आलम खाँ म्हणाले, ” कोविडनंतर हे माझे पहिलेच सादरीकरण आहे. या ठिकाणी माझी कला सादर करणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. यापुढील काळात भारतात आणखी काही कार्यक्रम सादर करण्यासाठी पुन्हा येण्याची संधी मिळेल, अशी मला खात्री आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: