fbpx

आरोग्यशास्त्र विभागात समाजाभिमुख संशोधन आणि उपक्रम.!!

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील संशोधन व विकासातील योगदान

पुणे: संशोधकांचे प्रशिक्षण, जगभरातल्या आरोग्याच्या संस्थांशी समन्वय, आरोग्य विषयक संस्थांचे बळकटीकरण, आयुर्वेदातील संशोधन, योगशास्त्र अभ्यासक्रम या आणि अशा अनेक महत्वाच्या बाबी मागील तीन वर्षात विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात विविध सामंजस्य कराराच्या माध्यमातून सुरू आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मागील तीन वर्षात दीडशेहून अधिक सामंजस्य करार केले. या माध्यमातून विद्यापीठ अनेक संस्थांशी जोडले गेले असून यातून समाजाभिमुख कामे आणि संशोधन करण्यात येत आहे.

करोना काळातील सिरो-सर्वेक्षण
आरोग्यशास्त्र विभागाने आयसर, पुणे व पुणे महानगरपालिका यांच्या सहयोगाने पुण्यातील विविध प्रभागातील महासाथीच्या स्थितीचे निरीक्षण केले. हा प्रकल्प महासाथीच्या सुरुवातीच्या काळात स्वास्थ्य सेवांचे नियोजन करण्याकरीता आवश्यक होता. विभागातील प्राध्यापक – डॉ. आरती नगरकर, डॉ. अभय कुदळे व यांनी विभागातील संशोधक विद्यार्थी यांना प्रशिक्षण देऊन हा प्रकल्प पूर्णत्वास नेला.

आयुष मंत्रालय – अश्वगंधा संशोधन
विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभाग आणि आयुष मंत्रालय यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार सध्या विद्यापीठात दोन एकत्रित संशोधन प्रकल्प सुरू आहेत. अश्वगंधा या आयुर्वेदिक औषधीचा कोविड काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोग होतो की नाही यावर भारतभर संशोधन होत असून त्याचे एक संशोधन केंद्र विद्यापीठात स्थापन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक या प्रकल्पावर काम करत आहेत. तर एकूणच प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचा उपयोग या विषयावर देखील विभागात संशोधन सुरू आहे अशी माहिती विभागातील प्रा.डॉ.गिरीश टिल्लू यांनी दिली.

कर्करोग आणि आमवाताच्या उपचाराकरीता संशोधन
आयुष मंत्रालयासोबत जो करार झाला आहे त्या माध्यमातून कर्करोग आणि आमवात या आजारांवर आयुर्वेदिक औषधे विषयावर संशोधन सुरू आहे. त्यासोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपँथीसोबत झालेल्या कराराच्या माध्यमातून निसर्गोपचार आणि जीवनपद्धती केंद्र विद्यापीठात उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे डॉ. शशिकांत दूधगावकर यांनी सांगितले.

लता मंगेशकर हॉस्पिटल – ‘ऑटीजम ‘ विषयक अभ्यासक्रम
विभागाने लता मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोबत जो करार केला त्या माध्यमातून ऑटीजम या विषयात अभ्यासक्रम ठरविण्यास मदत करणे, त्याला प्रमाणपत्राची जोड देणे आदी बाबी या विद्यापीठाने केल्या आहेत. त्यासोबतच कबीर बाग या संस्थेला योग अभ्यासक्रम तयार करून देण्याचे कामही विभागाकडून करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यशात्र विभागाच्या प्रमुख डॉ. आरती नगरकर यांनी दिली. याचबरोबर सेठ ताराचंद आयुर्वेदिक हॉस्पिटल बरोबर संशोधनाकरीता सामंजस्य करार करण्यात आला.

३० विद्यार्थ्यांना फेलोशिप तर ५० विद्यार्थ्यांचा संशोधनात सहभाग
आयुष मंत्रालयाकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्यातून विभागातून आतापर्यंत ३० विद्यार्थ्यांना फेलोशीप देण्यात आली आहे. तर २० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आले. याशिवाय विभागात सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून २५ विद्यार्थी व तीन प्राध्यापक विविध संशोधन प्रकल्पांवर काम करत आहेत असेही डॉ.गिरीश टिल्लू यांनी सांगितले.

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठासोबत करार
नाशिक येथे असणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठासोबाच्या करारानुसार लवकरच पारंपरिक वैद्यकशास्त्र व प्रशिक्षणाकरिता प्रकल्प सुरू होत आहेत. तसेच विद्यापीठांच्या प्राध्यापकांसाठी संशोधन कार्यपद्धती सर्वेक्षण करण्यात आले आहे.

दरम्यान आरोग्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून दोन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि संशोधन अभ्यासक्रम सुरू असून विद्यापीठातील या विविध उपक्रम आणि संशोधन प्रकल्पांसाठी आम्हाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे आणि प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांचे मार्गदर्शन मिळत असते अशी माहिती विभागप्रमुख डॉ.आरती नगरकर यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: