fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

ख्याल गायकी आणि व्हायोलीन’च्या सुरात रसिक मंत्रमुग्ध

पुणे :  ख्याल शैलीतील बहारदार गायन आणि व्हायोलीनच्या मधुर सुरांनी मंतरलेली एक अनोखी संध्याकाळ कला रसिकांनी अनुभविली. पिता – पुत्र यांचे गायन आणि तीन पिढीच्या कलाकारांनी सादर केलेल्या व्हायोलिन वादनात रसिक मंत्रमुग्ध झाले होते.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धातील पहिल्या सत्रात  दिवंगत पद्मभूषण पं. राजन मिश्रा यांचे बंधू तसेच ख्याल शैलीचे गायक पं. साजन मिश्रा व त्यांचे पुत्र स्वरांश मिश्रा  यांचे सहगायन झाले. त्यांनी राग यमन’मध्ये विलंबित एकतालात ‘पलकन से …’ ही रचना , मध्यलयीत टप ख्याल ही दुर्मिळ रचना त्यांनी सादर केली. ‘एरी आली पिया बिना’ ही प्रसिद्ध बंदिश, त्यानंतर तराणा सादर केला. खास रसिकाग्रहास्तव त्यांनी सादर केलेल्या ‘चलो मन वृंदावन के ओर’ या भजनाने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली.
त्यांना अजय जोगळेकर ( हार्मोनियम ), पंडित अरविंद कुमार आझाद (तबला ), विरेश शंकराजे व निषाद व्यास ( तानपुरा ) यांनी साथ केली.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे आमच्यासाठी गुरुकुल होते, असे सांगत साजन मिश्रा म्हणाले, ” मी आणि माझे मोठे भाऊ राजन मिश्रा यांनी १९७५ पहिल्यांदा सवाईत गायलो. त्यानंतर जितक्या वेळा गायलो मी आणि माझे मोठे भाऊ एकत्र गात आलो आहोत. तब्बल ५७ वर्षे आम्ही एकत्र गायलो. मात्र नुकतेच कोविड काळामध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे जाणे आजही स्वीकारू शकलो नाही. त्यांच्याशिवाय यंदा प्रथमच  सवाई सादर करत आहे. यंदा मला आमच्या पुढील पिढीतील कलाकार आणि मुलगा स्वरांश सोबत करत आहे. त्यालाही तुमचे आशीर्वाद द्या.”

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंदकांतदादा पाटील यांनी आज ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला भेट देत, भारतीय शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी पं. साजन मिश्रा व त्यांचे पुत्र स्वरांश मिश्रा यांच्या गायकीचा आनंद घेतला.

दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात ज्येष्ठ व्हायोलिन वादक विदुषी एन. राजम, त्यांच्या कन्या संगीता शंकर आणि  नाती रागिणी व नंदिनी शंकर यांचे व्हायोलिन वादन झाले. तीन पिढीच्या कलाकारांनी सादर केलेल्या दमदार वादनाला रसिकांनी टाळ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी राग दरबारी कानडा द्वारे आपल्या वादनाची सुरूवात केली. स्वरमंचावर चार व्हायोलिन वाजत असूनही जणू काही एकच व्हायोलिन वाजत आहे, असा अनुभव श्रोत्यांना आला. त्यांनी ‘माझे माहेर पंढरी…’ हा पंडित भीमसेन जोशी यांनी लोकप्रिय केलेल्या अभंग व्हायोलीनवर सादर केला. ‘जो भजे हरी को सदा’  या भाजनदवारे त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना मुकेश जाधव (तबला) , वैदेही अवधानी व दिगंबर जाधव ( तानपुरा) साथ केली.

शब्दांत वर्णन करू शकत नाही अशा भावना आज माझ्या मनात आहेत असे सांगत एन राजम  म्हणाल्या, ” सवाई गंधर्व महोत्सवाच्या अगदी पहिल्या की दुसऱ्या वर्षांत मी प्रथम येथे सादरीकरण केले. त्यावेळी माझे वडील सोबत आलेले होते. एका लहान खोलीत महोत्सव पार पडला होता. पंडित भीमसेन जोशी यांनी खूप वात्सल्य आणि आशीर्वाद देत मला बोलावलं होतं. तो अनुभव आजही माझ्या लक्षात आहे. ते सारंच अद्भूत होत. आज सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे हे स्वरूप पाहून मला अत्यंत आनंद होत आहे.”

पुण्यातील रसिक श्रोत्यांचे कौतुक करीत त्या म्हणाल्या की, ” पुण्यात ज्या प्रकारे लोक संगीत ऐकतात, समजतात ते अतिशय कमी ठिकाणी घडते. या ठिकाणी संगीतासाठी अतिशय समजूतदार श्रोता वर्ग आहे.”

राजहंस प्रकाशन’तर्फे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे लिखित ‘गान गुणगान – एक सांगीतिक यात्रा ‘ या पुस्तकाचे प्रकाशन आज ६८ सवाई गंधर्व महोत्सवात करण्यात आले. संगीतातील घराणी आणि त्यांची वैशिष्ट्ये, दिग्गज कलावंताचे खुमासदार किस्से, रागसंगीताबद्दलचा वेगळा अनवट नजरिया अशा विविध गोष्टींनी नटलेलं हे पुस्तक असून समीक्षकांपासून रसिकांपर्यंत, ‘पेन’सेनांपासून ‘कान’सेनांपर्यंत साऱ्यांना सहप्रवासी बनवणारी एक सांगीतिक यात्रा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading