महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या अध्यक्षपदी अजय ब्रह्मेचा, उपाध्यक्षपदी वैशाली आवाडे विजयी
पुणे: महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या आज झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत सहकार भारती पॅनलने महाराष्ट्र विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या पॅनलला धुळ चारत विजयश्री खेचून आणली. फेडरेशनच्या अध्यक्षपदी सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजय ब्रह्मेचा तर उपाध्यक्षपदी सहकार भारतीच्या वैशाली आवाडे विजयी झाल्या.
अजय ब्रह्मेचा यांना 11 मते तर विरोधी पॅनलचे उमेदवार निपुण कोरे यांना 10 मते पडली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत वैशाली आवाडे यांना 11 मते तर विरोधी पॅनलचे योगेश बन यांना 10 मते मिळाली.
सहकार भारतीने फेडरेशनचे विजयी संचालक सर्वश्री सत्यनारायण लोहिया, शंतनु जोशी, सुनील देवडा, चंद्रहास गुजराथी, रत्नाकर कदम, नानासाहेब सोनवणे, अशोक शेळके, शशिताई अहिरे यांचे आभार मानले आहेत. सहकार भारतीच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संगठन मंत्री संजय पाचपोर, भारतीय रिजर्व बँकेचे संचालक सतीश मराठे, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, उपाध्यक्ष वैशाली आवाडे व या निवडणुकीत मतदान करून सहकार भारतीवर विश्वास दाखवणाऱ्या नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आहे.