fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

‘भारत जोडो’मुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल : डॉ. गणेश देवी


पुणे : “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १०२ वर्षांपूर्वी देशभर झपाटून प्रवास केला. हजारो अनुयायांना स्वातंत्र्यसंग्रामात आणले. आज राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून तितक्याच झपाट्याने प्रवास करताहेत. देशातील द्वेष संपवून समाजाला जोडण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. भारत जोडो यात्रेमुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल. तसेच सामाजिक, राजकीय व अध्यात्मिक उद्देशाने निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतुन काँग्रेसही उभारी घेईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी केले.

श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महाराष्ट्रातील ‘भारत जोडो’ पदयात्रेतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. देवी यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (दि. ९) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी होते. यावेळी सौ. देवी, शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावर, माजी मंत्री रमेश बागवे, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, राजस्थान काँग्रेसचे नेते जुगल प्रजापती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, दत्ता बहिरट, चंद्रशेखर कपोते, रमेश अय्यर, चेतन अगरवाल, प्रशांत सुरसे, आयुब पठाण, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे आदी उपस्थित होते.

डॉ. गणेश देवी म्हणाले, “महात्मा गांधींचा जो झंजावात होता, तोच झंझावात राहुल गांधींच्या यात्रेत दिसत आहे. आपल्या हातून झालेल्या चुकांचा पश्चाताप करण्याची ही वेळ आहे. मात्र, या कठोर तपश्चर्येतून समाजातील तणाव, दुरावा दूर करून समाज व देशाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. भाजपच्या धोरणामुळे समाज विभागाला जात आहे. हे थांबवण्यासाठी द्वेषमुक्तीचा हा लढा अधिक विस्तृत व्हायला हवा. त्यासाठी भारत जोडो यात्रेत प्रत्येक भारतीयाने सहभागी व्हावे. आजचा अंधार दूर करून उद्याची पहाट उजाडणार, हा आशावाद या यात्रेने दिला आहे.”  

प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “देशाच्या इतिहासात ‘भारत जोडो’ यात्रा एक महत्त्वाची घटना आहे. दोन आठवडे ही यात्रा महाराष्ट्रातून गेली. या देदीप्यमान यात्रेत अनेकांना सहभागी होता आले नाही. त्यामुळे या छायाचित्र प्रदर्शनातून ही यात्रा पुणेकरांना अनुभवता येईल. निवडक २०० छायाचित्रातून ही चित्ररूपीयात्रा साकारली आहे.”

जयंत आसगावकर म्हणाले, “मोहन जोशी यांच्या प्रयत्नातून सुरु असलेल्या या सप्ताहाचे सातत्य खूप महत्वाचे आहे. राहुल गांधी झपाट्याने काम करताहेत. द्वेषभावना संपवण्याचे ध्येय घेऊन चालत आहेत. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अधिक लोकांनी यात सहभागी होऊन एकजूट दाखवावी. यातून तरुण कार्यकर्त्यांनाही प्रोत्साहन मिळत आहे.”

गजानन आमदाबादकर म्हणाले, “राहुल गांधींची भारत जोडो यात्रा भविष्याची नांदी आहे. शेतकरी या देशाचे चित्र बदलू शकतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करताहेत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेताहेत. त्यामुळे शेतकरी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. आपल्या मुलांच्या मनात द्वेष पसरवण्याचे काम होतेय, हे थांबले पाहिजे.”

अजित जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रथमेश आबनावे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading