fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsSports

स्पोर्ट्स अकादमी बारामती, वाघेश्वर, भैरवनाथ संघ सुस, आराध्या प्रतिष्ठान संघाचे विजय

खुला गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी : क्रीडा कला विकास प्रकल्प, लोणकर विद्यालय, महाराणा प्रताप संघ पराभूत

पुणे : स्पोर्ट्स अकादमी बारामाती, वाघेश्वर या मुलींच्या संघानी तर भैरवनाथ संघ सुस, आराध्या प्रतिष्ठान या मुलांच्या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करतना कै. प्रकाश (बापू) सणस यांच्या स्मरणार्थ, सरस्वती क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विजयी आगेकूच केली.

मुलींच्या गटाच्या अटीतटीच्या लढतीत स्पोर्ट्स अकादामी बारामती संघाने क्रीडा कला विकास प्रकल्प संघाला २५-२४ असे एका गुणाने पराभूत करताना आगेकूच केली. मध्यांतराला क्रीडा कला विकास प्रकल्प संघाने १६-९ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर स्पोर्ट्स अकादमी संघांने आपला खेळ उंचावला. विजयी स्पोर्टस अकादमी संघाकडून साक्षी काळे व गौरी सावरा यांनी आक्रमक चढाया करताना संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. शीतल निंबाळकरने पकडी करताना संघाला गुणांची कमाई करून दिली. पराभूत क्रीडा कला विकास प्रकल्प संघाकडून मनीषा राठोड, भूमिका गोरे व रुपाली डोंगरे यांनी दिलेली लढत संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही.

मुलींच्या झालेल्या सलामीच्या लढतीत वाघेश्वर स्पोर्ट्स संघाने लोणकर विद्यालय संघाला ४९-१६ असे एकतर्फी पराभूत केले. मध्यंतराला वाघेश्वर स्पोर्ट्स संघाने २६-८ अशी आघाडी घेतली होती. वाघेश्वर संघाकडून किशोरी गोडसे, साक्षी सोनावणे यांनी आक्रमक चढाया तर वैभवी जाधव, स्नेहल तागड यांनी पकडी करताना संघाच्या विजय मिळवून दिला. पराभूत लोणकर विद्यालय संघाकडून सीमा राठोड, समीक्षा पाटेकर यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

मुलांच्या गटात भैरवनाथ कबड्डी संघ सुस संघाने महाराणा प्रताप संघाला २७-९ असे पराभूत करताना स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. मध्यंतराला १४-४ अशी आघाडी भैरवनाथ संघाने घेतली होती. भैरवनाथ संघाकडून सुलतान डांगे, सनी पवार यांनी आक्रमक चढाया करताना संघाचा गुणफलक हलता ठेवला. त्याला आदी शेखने पकडी करताना सुरेख साथ दिली. पराभूत महाराणा प्रताप संघाकडून आदित्य राऊत व कार्तिक अडसूळ यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

मुलांच्या गटात आराध्या प्रतिष्ठाण संघाला सरनौबत पिलाजी गोळे संघाने १५-२१ असे पराभूत केले. मध्यंतराला सरनौबत पिलाजी गोळे संघाने १२-४ अशी आघाडी घेतली होती. विजयी संघाकडून रोहित होडशीळ, विशाल ढवळे यांनी चढाया तर प्रणय देवकर व आदित्य शिंदे यांनी पकडी करताना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत आराध्या प्रतिष्ठाण संघाकडून सुरज कदम व राहुल मोदक यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

मुलांच्या गटाच्या काल रात्री उशीरा झालेल्या लढतीमध्ये नवमहाराष्ट्र कबड्डी संघाने ओम साई चिखली संघाला २५-९ असे पराभूत केले. मध्यंतराला नवमहाराष्ट्र संघाने ११-६ अशी ५ गुणांची महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. विजयी नवमहाराष्ट्र संघाकडून अजय गायकवाड, अक्षय कटके यांनी चढाया करताना तर सौरभ कटकेने पकडी करताना संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पराभूत ओम साई संघाकडून शुभम नेवाळेने लढत देण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशश्वी होऊ शकला नाही.

पर्व क्रीडा संस्था संघाने समर्थ क्रीडा मंडळ संघाला ३४-१२ असे २२ गुणांनी पराभूत केले. पर्व संघाकडून अजय चव्हाण, अजय सोळंके, सनी जाधव यांनी आक्रमक चढाया करताना संघाला मध्यंतराला २७-१ अशी आघाडी मिळवून दिली होती. समर्थ संघाकडून अयाज पठाण व सागर भांडवलकर यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

यश काटे व अभिषेक बालवाडकर यांच्या दमदार खेळाच्या जोरावर क्रांती मित्रमंडळ संघाने श्री शिवाजी मंडळ संघाला १८-११ असे पराभूत करताना आगेकूच कायम राखली. मध्यंतराला क्रांती संघाने ७-५ अशी २ गुणांची महत्वपूर्ण आघाडी गेहतली होती. मध्यंतरानंतर यश काटे व अभिषेक बालवाडकर यांनी चढाई करताना गुणांची कमाई केली. श्री शिवाजी मंडळ संघाकडून ऋषिकेश पंडित व रोहन दिवसे यांनी चांगली लढत दिली.

स्वरूपवर्धिनी संघाने शिवराणा प्रताप संघाला २७-८ असे २१ धावांनी पराभूत करताना स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. शाहिद शेख, ओंकार देशमुख व साहिल माने यांनी धडाकेबाज चढाया करताना संघाला मध्यंतरालाच १५-४ अशी ११ गुणांची महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. पराभूत संघाकडून अथर्व सिंग, श्रीनाथ चव्हाण यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading