fbpx
Thursday, September 28, 2023
Latest NewsPUNE

पुण्यधाम आश्रमात १२ दांपत्यांचा सामूहिक विवाह सोहळा आनंदात संपन्न

पुणे : हेमंत ऋतूतील मार्गशीर्षासारखा सर्वोत्तम महिना, सुखद उबदार सकाळ, रविवारच्या सुटीची सवड आणि शुभकार्याच्या उत्साहाने गजबजलेले वातावरण हे चित्र दिसले नुकतेच पुण्यातील पुण्यधाम आश्रमात. सुमारे २५०० लोकांचा समूह एका मंगल सोहळ्याची उत्कंठेने प्रतिक्षा करत होता. हा सोहळा होता महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या आणि कौटुंबिक पार्श्वभूमी गरीब असणाऱ्या १२ दाम्पत्यांच्या सामूहिक विवाहाचा. जोडीदारासमवेत आयुष्याची गाठ बांधण्याचा हा क्षण त्या दाम्पत्यांसाठी अविस्मरणीय, उपस्थितांसाठी भारावून टाकणारा आणि पुण्यधाम आश्रमासाठी कृतकृत्य करणारा ठरला. पुण्यधाम आश्रमातर्फे राबवण्यात येणाऱ्या या थोर सामाजिक उपक्रमाचे यंदाचे हे सलग सहावे वर्ष आहे.

यासंदर्भात सहर्ष प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्यांनी जनसेवा ही ईश्वरसेवा हे आपल्या आयुष्याचे ब्रीद मानले आहे त्या पुण्यधाम आश्रमाच्या अध्यक्षा मा कृष्णा कश्यप म्हणाल्या, थाटामाटात विवाहाचा खर्च ज्यांना परवडत नाही अशा गरीब कुटूंबातील मुलींसाठी पुण्यधाम आश्रमातर्फे दरवर्षी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. आपले कुटूंबीय, नातलग व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत थाटात विवाह करण्याचे त्यांचे स्वप्न या उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण केले जाते. मुख्य म्हणजे त्यातून हुंड्याच्या अनिष्ट प्रथेला नाकारुन लोकांच्या मानसिकतेत बदल घडवण्याचा प्रयत्न केला जातो.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. सोनेरी-लाल साड्या आणि अलंकारांनी सजलेल्या नववधू, शेरवानी, फेटा व मोजडी अशा रुबाबदार पोशाखांत शोभणारे नवरदेव आपल्या सौंदर्याने खुलून दिसत होते. संगीताच्या तालावर नाचणाऱ्या वऱ्हाडासह सर्व नवरदेव मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी दाखल झाले. तेथे त्यांच्या स्वागतासाठी वधूकडची कुटूंबे आतुरतेने वाट बघत होती. अखेर प्रत्येक नवरदेवाने आपापल्या वधूच्या साथीने सजवलेल्या मंडपात प्रवेश केला आणि विद्वान पंडितांनी विवाहविधीचे मंत्रपठण सुरू केले. वरमाला, सात फेरे व कन्यादान झाल्यावर उपस्थित प्रतिष्ठितांच्या साक्षीने या दाम्पत्यांनी जीवनगाठ बांधली. हा विवाह सोहळा पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने अंतरपाट, सप्तपदी व कन्यादान अशा विधींसह संपन्न झाला. त्यानंतर सर्वांनी रुचकर मराठी भोजनाचा आस्वाद घेतला.

अध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्या उपस्थितीत मा कश्यप यांनी नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले आणि वैवाहिक जीवनाचा प्रारंभ करताना मदत म्हणून वर-वधूसाठी नवे कपडे, ब्लँकेट्स व आवश्यक घरगुती वस्तू या स्वरुपांत भेटींचे वाटप केले.

नववधूंची पाठवणी हा या सोहळ्यातील सर्वांत हृदयस्पर्शी क्षण होता. नवपरिणीतांनी जड अंतःकरणाने व साश्रू नयनांनी आपल्या कुटूंबियांचा निरोप घेऊन वैवाहिक जीवनाची सुरवात करण्यासाठी जोडीदारासह सासरच्या नव्या घराकडे प्रस्थान केले. या प्रसंगाने उपस्थित सर्वांनाच हळवे केले. एकंदर हा सार्वजनिक विवाह सोहळा अत्यंत यशस्वी ठरला.

या महान उपक्रमाचे सर्व श्रेय मा कृष्णा कश्यप यांना आहे, ज्यांनी अशा मोठ्या सार्वजनिक सोहळ्याची काटेकोर आखणी व परिपूर्ण अमलबजावणी केली. त्यांचा सर्वतोपरी पाठिंबा, उपस्थिती व प्रेरणा याखेरीज पुण्यधाम आश्रमात कोणतेही कार्य शक्य होत नाही.

पुण्यधाम आश्रम चालवणारी पुण्यातील विश्व जागृती मिशन ट्रस्ट ही  विना-नफा तत्त्वावर चालवली जाणारी स्वयंसेवी संघटना आहे. पुण्यधाम आश्रम हे मुख्यत्वे ज्येष्ठ नागरिकांसाठीचे आधारगृह असून ते सुंदर, शांत परिसरात वसलेले आहे. आश्रमाच्या परिसरात सिद्धेश्र्वर महादेव मंदिर, कैलास शिखर, साई मंदिर, ३५ हून अधिक देशी गाईंची गोशाळा, ग्रंथालय व वाचनकक्ष, एकाचवेळी ३००० लोकांना सामावून घेणारे व सामाजिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयोगात येणारे कृष्ण अवतार सांस्कृतिक भवन आहे.

याखेरीज पुण्यधाम आश्रमातर्फे इतरही अनेक समाज कल्याण उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या कुटूंबांचे पुनर्वसन, महाराष्ट्राच्या नक्षलवाद प्रभावित भागातील गरजू मुलींच्या शिक्षणासाठी अर्थसाह्य, गरीब व वंचित शेतकऱ्यांच्या मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळे, येरवडा कारागृहातील महिला कैद्यांसाठी आरोग्य शिबीरे व प्रेरणात्मक कार्यक्रम आदी विविध गोष्टींचा समावेश आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: