fbpx

पुण्यात ५ ते ८ जानेवारी दरम्यान रंगणार स्वरझंकार महोत्सव

पुणे : विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असलेला ‘स्वरझंकार’ हा सांगीतिक महोत्सव यंदा ५ ते ८ जानेवारी दरम्यान कर्वेनगर परिसरातील डी पी रस्ता येथील पंडित फार्म्स याठिकाणी होणार आहे. या चार दिवसीय महोत्सवात संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार आपली कला सादर करतील, अशी माहिती व्हायोलिन अकादमीचे संस्थापक आणि  प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेसाठी व्हायोलिन वादक तसेच स्वरझंकार महोत्सवाचे आयोजक राजस आणि तेजस उपाध्ये देखील उपस्थित होते.

महोत्सावाबाबत माहिती देताना उपाध्ये म्हणाले, “ महोत्सवाचे यंदा १४ वे वर्ष आहे. यावर्षीच्या कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे ज्येष्ठ गझल गायक हरिहरन आणि गायक पद्मभूषण उस्ताद राशिद खान यांची जुगलबंदी ऐकण्याची संधी पहिल्यांदाच पुणेकरांना या महोत्सवाच्या निमित्ताने मिळणार आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे  हे आपले ‘युट्युब कलेक्टीव्हस’ हा लोकप्रिय कार्यक्रम सादर करणार आहेत.’’

महोत्सावात पहिल्या दिवशी (५ जानेवारी) ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका डॉ. मीता पंडित यांचे गायन होईल. डॉ. पंडित या पं. लक्ष्मण कृष्णराव पंडित यांच्या कन्या व शिष्या आहेत. त्या आपल्या परिवारातील सहाव्या पिढीतील गायिका आहेत.  कार्यक्रमात दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व शिष्य प्रसिद्ध संतूरवादक राहुल शर्मा आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचे नातू व शास्त्रीय गायक राहुल देशपांडे हे देखील आपली कला सादर करतील.

दुसऱ्या दिवशी (६ जानेवारी) रोजी गायिका नबनिता चौधरी यांचे गायन होईल. नबनिता यांनी आपल्या गायनाचे प्राथमिक धडे पद्मभूषण पंडित राजन आणि पं. साजन मिश्रा यांच्याकडून घेतले. त्यानंतर सुप्रसिद्ध तालवाद्यवादक सेल्वा गणेश, तबला वादक पद्मश्री पं विजय घाटे आणि कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर यांचा ‘मेलोडीक रिदम’ हा कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी आश्विनी भिडे यांचे गायन होईल.

तिसऱ्या दिवशी (७ जानेवारी) संगीत मार्तंड पं.जसराज यांचे शिष्य आणि मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर यांचे गायन, व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिनवादन, प्रसिद्ध सतारवादक पद्मश्री उस्ताद शाहिद परवेज यांचे सतारवादन सादर होईल. पंडित अतुलकुमार उपाध्ये आणि उस्ताद शाहिद परवेझ यांच्या व्हायोलिन – सतार जुगलबंदीने या दिवसाची सांगता होईल.

महोत्सवात चौथ्या आणि शेवटच्या दिवशी (८ जानेवारी) ज्येष्ठ गझल गायक हरिहरन हे गझल सादर करतील. त्यानंतर गायक उस्ताद राशिद खान यांचे गायन होईल. हरिहरन आणि उस्ताद राशिद खान यांच्या गझल – गायन जुगलबंदीने या महोत्सवाचा समारोप होईल. तब्बल १० वर्षानी ही जुगलबंदी रसिकांना ऐकायला मिळणार आहे.

या महोत्सवासाठी एमआयटी वर्ड पीस युनिव्हर्सिटी, बढेकर ग्रुप, मँस्कॉट, अभिनव ग्रुप, लोकमान्य मल्टीपर्पज को -ऑपरेटीव्ह सोसायटी, बर्ज, विलास जावडेकर डेव्हलपर्स, पीएनजी ज्वेलर्स, ओर्लीकाँन बाल्झर्स, विलो पंप्स, काका हलवाई आणि गिरीकंद हॉलीडेज यांचे सहकार्य लाभले आहे. हा कार्यक्रम सशुल्क असणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: