fbpx

आत्मिक समाधानातून व्हावी कलाकृतीची निर्मिती : मिलिंद मुळीक


पुणे : कलेतून आनंदनिर्मिती होत असताना कलाकाराला आत्मिक समाधानही मिळाले पाहिजे. स्वत:मधील कौशल्य विकसित होण्यासाठी, स्वत:मधील उणीवा जाणून घेण्यासाठी कलाकाराने कठोर परिश्रम आणि सातत्याने सराव करणे गरजेचे असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांनी आज येथे केले. कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रदर्शने उपयुक्त ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.

जलरंगातून साकारलेला निसर्ग, व्यक्तिचित्रे, जुन्या पुण्यासह ग्रामीण आणि शहरी भागाचे सौंदर्य दर्शविणाऱ्या कलाकृतींच्या ‘गुरुदक्षिणा’ या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन दर्पण आर्ट गॅलरी येथे आज (दि. 7 डिसेंबर 2022) मुळीक यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. प्रदर्शनात 24 चित्रकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या असून सर्व कलाकार मिलिंद मुळीक यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. यातील बहुतांश चित्रकार हौशी असून आपआपल्या व्यवसायात पारंगत आहेत. ‘गुरुदक्षिणा’ हे प्रदर्शन दि. 11 डिसेंबर 2022 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळात खुले असणार आहे.
सरावातील सातत्य हा मुद्दा अधोरेखित करून मुळीक म्हणाले, गुरूंकडे प्रशिक्षण घेत असताना कलेतील सौंदर्यस्थळे ओळखण्याची क्षमता वाढते. स्वत:ला कलाकार म्हणून विकसित करण्यासाठी, स्वत:च्या कलेचे विश्लेषण करण्यासाठी, कलेची मांडणी करताना विचार आणि कृतीचा समन्वय साधण्यासाठी सरावाशिवाय पर्याय नाही. हौशी कलाकारांना मार्गदर्शन करताना मुळीक म्हणाले, फावल्यावेळात कला जोपासत असाल तरी कलाकृती ठराविक वेळेत पूर्ण करण्याचा अट्टाहास न करता ती कलाकृती साकारताना त्यातून आनंद कसा मिळेल याकडे लक्ष केंद्रीत करा.
संयोजक अशोक भागवत यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनाविषयी माहिती दिली. अशोक पानवलकर यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.

मिलिंद मुळीक यांचे शनिवारी प्रात्यक्षिक
मिलिंद मुळीक आणि जलरंग हे एक अतुट समिकरण आहे. कागदावर जलरंगात अत्यंत वेगाने चित्र रेखाटणे हे त्यांचे कौशल्य आहे. तंत्रकौशल्य आणि सर्जनशिलता यांचा अनोखा संगम त्यांच्या चित्रांमधून दिसून येतो. या चित्रप्रदर्शनिअंतर्गत शनिवार, दि. 10 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता मिलिंद मुळीक जलरंगातून प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: