मातृभाषेचा आदर असावाच, त्याचबरोबर इतर भाषा शिकणेही गरजेचे – सुधा मूर्ती
पुणे : “ भाषा हे चांगले जीवन जगण्याचे एक साधन आहे. मातृभाषा ही तुम्हाला तुमच्या संस्कृतीशी जोडते. त्यामुळे तिचा आदर असायलाच हवा. त्याचबरोबर ज्याठिकाणी तुम्ही राहता, जिथे काम करता तेथील स्थानिक भाषादेखील प्रत्येक व्यक्तीने शिकलीच पाहिजे, ते आपले नैतिक कर्तव्य आहे,’’ असे मत लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी व्यक्त केले.
कन्नड संघ, पुणे संचालित डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मूर्ती यांनी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, उपाध्यक्ष डॉ. नारायण हेगडे, इंदिरा सालीयान, सचिव मालती कलमाडी उपस्थित होते.
कार्यक्रमात मुलांशी संवाद साधताना मूर्ती म्हणाल्या, “ शालेय जीवन हे प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील एक उत्तम काळ असतो, कारण तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तुमचे पालक तुमच्यासोबत असतात. मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक असतात. त्यामुळे मुलांनी या काळात चांगला अभ्यास करावा, भरपूर खेळावे पण कम्प्युटर गेम्स नव्हे, तर मैदानी खेळ खेळावे. आयुष्यात ज्ञान ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. शिक्षक तुम्हाला हे ज्ञान देतात. त्यामुळेच शिक्षक हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वपूर्ण व्यक्ती असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकांचा आदर केला पाहिजे.’’
पालकांशी संवाद साधताना मूर्ती म्हणाल्या,“ आपल्या मुलाची/ मुलीची तुलना इतरांच्या मुला-मुलींशी करणे ही सर्वात मोठी चूक पालक करतात. इतरांशी होणारी तुलना ही मुलांच्या आयुष्यातील एक मोठे दुर्दैव ठरते. त्याचबरोबर आपण पूर्ण करू न शकलेल्या गोष्टी आपल्या मुलांनी कराव्यात हा पालकांचा अट्टहासदेखील चुकीचा ठरतो. तुम्ही तुमच्या मुलाला/मुलीला स्वतंत्र खोली देता, कम्प्युटर देता, सुट्टीत फिरायला घेऊन जाता याचा अर्थ मुलांनी तुमच्या अपूर्ण अपेक्षा पूर्ण केल्याच पाहिजे असे नाही. त्यांना एक स्वतंत्र आयुष्य आहे, हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.’’
पुणे शहराबाबत आपल्या भावना व्यक्त करताना मूर्ती म्हणाल्या, “ पुणे शहराने मला माझ्या आयुष्यातील अनेक अविस्मरणीय धडे दिले आहेत, त्यापैकी स्पष्टवक्तेपणा आणि पुढारलेली विचारसरणी हे सर्वात महत्वाचे धडे आहेत. येथील लोकांचे हे दोन्ही गुण मला अतिशय आवडतात. पुण्यातील लोक एखादी गोष्ट पटली नाही तर शांत बसत नाहीत, तर त्याबाबत थेट प्रश्न करतात. त्यासाठी कोणीही कितीही वाईट म्हणू देत, पण पुण्यातील लोकांनी आपला हा गुण सोडू नये असे मी मानते.’’
कार्यक्रमात कुशल हेगडे यांनी संस्थेच्या गेल्या ५० वर्षातील प्रवासाबाबत माहिती दिली. तर मालती कलमाडी यांनी संस्थेने आतापर्यंत पार केलेले विविध महत्वपूर्ण टप्पे आणि सोबतच संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या अटल टीकरिंग लॅब, मानसिक आरोग्यविषयक समुपदेशन, कावेरी गिफ्टेड एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, पालक समुपदेशन केंद्र, कावेरी नर्चरिंग सेंटर, रुरल कनेक्ट अशा विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. यावेळी मूर्ती यांच्या हस्ते कावेरी संघाच्या विविध शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये कामिनी सक्सेना, लक्ष्मी गांधी, डॉ. अशोक अगरवाल, चंद्रकांत हरकुडे, डॉ. माधुरी चित्तेवान, डॉ. कंचन देशपांडे, रेश्मा देशपांडे यांचा समावेश होता. त्याचबरोबर मूर्ती यांच्यावर कविता लिहिणाऱ्या सन्वी कुलकर्णी, कनका केळकर या दोन्ही विद्यार्थिनींचा मूर्ती यांनी गणपतीची प्रतिमा भेट देऊन विशेष सत्कार केला.
