Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

सनातन धर्मातील छोट्यातील छोटी गोष्ट शास्त्रीय – स्वामी गोविंददेव गिरी महाराज ( किशोरजी व्यास) यांचे प्रतिपादन

पुणे : सनातन धर्म व्यापक आहे. सनातन धर्मातील छोट्यातील छोटी गोष्ट शास्त्रीय आणि प्रचिती देणारी आहे. सनातन धर्मातील गोष्टी सत्य आहेत आणि त्यांचे पालन करण्यातच आपले कल्याण आहे. हजारो वर्षांपूर्वी परमेश्वराचा अनुभव येत होता, आता येत नाही असे नाही. हे अनुभवाचे शास्त्र आहे. त्या अनुभूतीची सूत्रे संताच्या वाड्.मयात गवसतील, असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरी महाराज (किशोरजी व्यास) यांनी केले.

बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ वा दत्त जयंती सोहळा दिनांक ६ डिसेंबर पर्यंत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यांतर्गत पहिल्या दिवशी श्री दत्त भक्ती कथेला प्रारंभ झाला. यावेळी पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पं. वसंतराव गाडगीळ, ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. श्री गुरुदत्त दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट व श्री मुकुंद भवन ट्रस्ट तसेच श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग यांच्या सहयोगाने श्री दत्त भक्ती कथा हा कार्यक्रम दररोज दुपारी ४ ते ६ यावेळेत होणार आहे. याशिवाय सायंकाळी आयोजित सप्तस्वरोत्सवात दररोज सायंकाळी ६ ते ९ यावेळेत सांस्कृतिक व सांगितिक कार्यक्रम होतील.

स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, अभ्यासू व्यक्तीचा चमत्कारांवर विश्वास नसतो. विचारांची प्रधानता आणि तर्काची मांडणी असलेले साहित्य त्यांना लागते, त्यासाठी पूज्य टेंबे स्वामी यांचे साहित्य वाचले पाहिजे. दत्त महात्म्याची उकल ज्या पद्धतीने त्यांनी केली आहे ती इतर साहित्यातून झालेली दिसत नाही.

ते पुढे म्हणाले, आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वर प्राप्ती होत नाही तर भाव हा भगवंत प्राप्तीचा विचार आहे. निष्पाप भावातून परमेश्वराची प्राप्ती होते. त्यामुळे अंत:करणाचा भाव गमावू नका. दत्त महाराजांचा अवतार अनन्यसाधारण आहे. त्यांचा अवतार हे परमात्म धन आहे. भारतीय संस्कृतीतला महत्वाचा शब्द म्हणजे तप. तपोमय जीवन समजून घेण्याकरिता पूज्य टेंबे स्वामी यांचे साहित्य वाचले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.

दत्त भक्ती कथेनंतर दुस-या सत्रात ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांचा श्री दत्त भक्ती गीतांचा कार्यक्रम देखील झाला. सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading