आदिवासी समाजजीवनावर संशोधन करण्याची संधी
प्राध्यापक, संशोधकांना आवाहन: कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांचा राष्ट्रीय परिषदेत सहभाग
पुणे: आदिवासी समाज हा निसर्गाशी शेकडो वर्षापासून जोडलेला आहे, त्यातून त्यांची संस्कृती, कला, औषधी वनस्पतींची जाण, जल – जंगल -जमीन साठी त्यांचा संघर्ष हा जगासमोर येत त्यावर पुढील काळात संशोधन होणे गरजेचे असल्याचा सूर नुकत्याच आयआयटी दिल्ली येथे झालेल्या परिषदेत काढण्यात आला. या परिषदेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे सहभागी झाले होते.
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या अनुषंगाने राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग यांच्यातर्फे ‘ आदिवासी संशोधन – अस्मिता, अस्तित्व आणि विकास ‘ या विषयावर दिल्ली येथील विज्ञान भवन, आयआयटी दिल्ली व राष्ट्रपती भवन येथे २७ व २८ नोव्हेंबर २०२२ रोजी ही राष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेला विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ.जगदेश कुमार व राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान, सचिव अल्का तिवारी, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदचे अध्यक्ष डॉ.जे.के.बजाज, राष्ट्रीय वनवासी कल्याण आश्रमाचे सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह भारतभरातून १०४ विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. या परिषदेत आदिवासी समाजजीवनावर संशोधन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी https://icssr.org/special-call-tribal-2022-notice ही लिंक उपलब्ध करून दिली आहे. यासाठी २६ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
या परिषदेत बोलताना डॉ. कारभारी काळे म्हणाले, आदिवासी समाज हा कायम निसर्गासोबतच राहिल्याने त्यांचे औषधी वनस्पती विषयाचे ज्ञान सखोल आणि प्रभावी आहे. यावर संशोधन होत, ही औषधी सर्व जगासमोर येणे गरजेचे आहे. तसेच आदिवासी समाजातील बहुतांशी जाती, प्रजातींची भाषा ही केवळ बोली स्वरूपात आहे ती लिखित स्वरूपात त्याची भाषा तयार करत त्यावर अभ्यास होणे गरजेचे आहे. त्याला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास हे अधिक सक्षमपणे होईल असेही डॉ.काळे यावेळी म्हणाले. विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधकांनी या संशोधनात अधिकाधिक सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील डॉ.काळे यांनी केले.
या परिषदेतील सहभागींना राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी संबोधित केले. यावेळी द्रौपदी मुर्मु म्हणाल्या, आदिवासी समाज निसर्गाच्या अधिक जवळ आहे या समाजाला सोबत घेत भारताचा शास्वत विकास होईल यात शंका नाही.
प्रत्येक विद्यापीठाने आपल्या धोरणात आदिवासी संशोधन हा भाग ठेवणे गरजेचे आहे असे तज्ज्ञ व्यक्तींकडून सांगण्यात आले. या परिषदेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रा. डॉ.राजेंद्र घोडे आणि रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ.प्रगती ठाकूर, शिक्षणशास्त्र विभागातील प्रा.डॉ.निशा वळवी हे देखील उपस्थित होते.
