दिव्यांग अपत्याचे आईपण कष्टप्रद आणि क्लेशकारकही : डॉ. प्राजक्ता कोळपकर
पुणे : दिव्यांग अपत्याचे आईपण निभावणे कष्टप्रद तर असतेच पण क्लेशकारकही असते. आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी आई त्या समस्यांविरुद्ध चिवटपणे लढा देते; सहजासहजी हार मानत नाही. दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना समाजाचे सहकार्य मिळतेच असे नाही तर त्या आईला घरातूनही विरोधाला सामोरे जावे लागते, असे प्रतिपादन प्रा फाउंडेशनच्या संचालिका डॉ. प्राजक्ता कोळकपर यांनी केले. ‘कोरोना’काळात शासनाने समाजातील सर्व घटकांसाठी उपाययोजना केल्या; परंतु दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केली अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
प्रा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग मुलांची सेवाभावनेतून जोपासना करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. प्राजक्ता कोळपकर यांचा रंगत संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 27 नोव्हेंबर 2022) सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. ‘जोपासना दिव्यांगांची’ या उपक्रमाअंतर्गत त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमही झाला आहे. त्यावेळी त्यांनी अनोख्या वाटेवरील प्रवास उलगडला. डॉ. कोळपकर यांच्याशी ॲड. प्रमोद आडकर आणि भूषण कटककर यांनी संवाद साधला. प्रज्ञा महाजन व मैथिली आडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रपूरसारख्या आदिवासी भागातून सुरू झालेला प्रवास नागपूरमार्गे पुण्यापर्यंत कसा पोहोचला आणि घरातील मंडळींविरोधात बगावत करून पुण्यात सन्मानाचे जगणे कसे सुरू झाले हा आठवणींचा पट डॉ. कोळपकर यांनी सुरुवातीस उलगडून सांगितला. खासगी आयुष्यातील आणि समाजातील काही घटकांकडून आलेले वाईट अनुभव कथन करून त्या पुढे म्हणाल्या, संस्थेची उभारणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. विशेष मुलांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न महिलांसमोर प्रकर्षाने असल्याचे दिसून आले. असे मूल सांभाळणे कठीण असल्याने मुलांचे जगणे संपावे यासाठी देवापुढे हात पसरणाऱ्या महिलाही पाहिल्या. असे प्रसंग जेव्हा समोर आले त्या वेळी ‘तू गेलीस तर तुझ्या मुलाला हक्काचे घर आहे’ असे आश्वस्त करून महिलांना आधार दिल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना काळात दिव्यांग मुलांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. सर्व व्यवहार ठप्प असताना संस्था मात्र दिव्यांगांसाठी पूर्णवेळ सेवा देत होती, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. कोळपकर म्हणाल्या, दिव्यांग मुलांना लैगिंक भावना असतात पण त्या शरीर भावना असतात. त्या भावनांना मानसिक आधार नसतो. काही वेळेस या भावना उचंबळून येतात. असे कशा मुळे होते याचा शोध घेतला असता त्याचे कारण म्हणजे दूरचित्रवाहिन्यांवरून सुरू असलेले ओंगळवाणे प्रदर्शन. समाजकार्याला पाठबळ मिळण्याची आवश्यकता आहे. विरोधासाठी विरोध करू नये, जमेल त्या पद्धतीने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षाही डॉ. कोळपकर यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी शांताराम खामकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका भूषण कटककर यांनी विशद केली. डॉ. कोळपकर यांच्या परिचय प्राजक्ता वेदपाठक यांनी करून दिला तर सन्मानपत्राचे वाचन निरुपमा महाजन यांनी केले. सूत्रसंचालन प्राजक्ता पटवर्धन यांनी केले. सत्कार सोहळ्यानंतर संघर्षगाथा हे निमंत्रितांचे कविसंमेलन झाले.
