छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाविरोधात एकत्र यावे; संजय राऊतांचे संभाजीराजे-उदयनराजेंना आवाहन
मुंबई : देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान केला जातोय. भाजपकडून त्यांची वारंवार विटंबना केली जात आहे. याविरोधात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान या संदर्भात छत्रपती संभाजी राजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही एकत्र यावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे भोसले यांची भावना ही संपूर्ण राज्याची भावना आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीने एकत्रित येत शिवाजी महाराजांचा अवमान करणा-यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर शिंदे-फडणवीस सरकारला अल्टिमेटम दिला आहे असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
भाजपकडून वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत. राज्यातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. या विरोधात सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे भोसले असतील, महाविकास आघाडी असेल वा संभाजी ब्रिगेड असेल, ज्यांना ज्यांना महाराजांवर श्रद्धा आहे, ज्यांना ज्यांना महाराजांचा स्वाभिमान आहे, त्या सर्वांनी या अन्यायाविरोधात एकत्र यावे. महाराजांवर श्रद्धा असणा-या प्रत्येकाने एकत्र यावे. महाराजांची विटंबना करणा-यांविरोधात एकत्र यावे, असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत.
