fbpx

घराणा संमेलनात रसिकांनी अनुभवली विविध घराण्यांची गायन शैली

– प्रेरणा संगीत संस्थेतर्फे आयोजित दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रम संपन्न

पुणे : जयपूर–अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या प्रेरणा संगीत संस्थेतर्फे नुकतेच दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पहिल्या दिवशी संस्थेच्या भारतातील तसेच परदेशातील शिष्यांनी आपली गायन कला सादर केली. तर दुसऱ्या दिवशी संपन्न झालेल्या घराणा संमेलनात रसिकांनी विविध घराण्यांची गायन शैली अनुभवली.

संस्थेतर्फे आयोजित हा सांगीतिक कार्यक्रम नवी पेठ येथील श्रमिक पत्रकार भवनाच्या कमिन्स सभागृह येथे संपन्न झाला. कार्यक्रमात पहिल्या दिवशी विदुषी सानिया पाटणकर यांच्या हैदराबाद, मुंबई, नाशिक, पुणे, बंगळूरू, स्विझर्लंड येथील शिष्यांनी पुण्यात येऊन आपले गायन सादर केले. यामध्ये आर्जवी पाटणकर  शौनक सरदार, अंकिता भेटीवाल, डॉ.विकास वैद्य, मयुरा मांगले, रिद्धीमा देशपांडे, निशिगंधा देशमुख-क्षीरसागर, चैतन्य कुलकर्णी, ऋचा खोत, अवनी किनीकर, सोनाली सरदेशपांडे, स्मिता कुलथे, रुची शीरसे, सुगंधा उपासनी, गौरी दासारी यांचा सहभाग होता. त्यांना कार्तिक स्वामी, ओमकार भोर्डे, तुषार केळकर यांनी साथसंगत केली. यावेळी संस्थेतर्फे संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीता दहिभाते आणि शीला गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी विविध घराण्यातील कलाकारांचा समावेश असलेला ‘घराणा संमलेन’ हा सांगीतिक कार्यक्रम संपन्न झाला. ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका  विदुषी ज्योती अय्यर यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी राग चारुकेशी आणि राग अभोगी’मध्ये विविध बंदिशी आणि तराणे सादर केले. त्यांनतर नाशिक येथील रहिवासी आणि पंडित आनंद भाटे यांचे शिष्य आणि किराणा घराण्याचे गायक आशिष रानडे यांनी राग यमन’मध्ये तीन बंदिशी सादर केल्या. कार्यक्रमात जयपूर-अत्रौली  घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांनी ‘कौशी’ अंगाचा कानडा हा ‘जयपूर’ घराण्याच्या अंगाने सादर केला. कार्यक्रमात डॉ. कस्तुरी पायगुडे -राणे यांनी पंडित भीमसेन जोशींवर आधारित पुस्तकावर विवेचन केले. कार्यक्रमास जयपूर -अत्रौली घराण्याचे गायक पंडित रघुनंदन पणशीकर, पुणे फेस्टिवल’चे रवींद्र दुर्वे आणि गानवर्धन संस्थेचे दयानंद घोटकर उपस्थित होते.

प्रमुख कलाकारांना पंडित बाळकृष्ण अय्यर, चारुदत्त फडके, मिथिलेश कुमार झा, माधव लिमये यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन वासंती ब्रम्हे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: