fbpx

राज्यपालांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या – शरद पवार

मुंबई : राज्यपाल या पदावर बसणा-या व्यक्तीने जबाबदारीने बोलणे गरजेचे असते. सध्याच्या राज्यपालांनी अनेकवेळा अशी वक्तव्ये केली त्यावेळी आम्ही त्या पदाची गरिमा राखण्यासाठी काही बोललो नव्हतो. मात्र, आता शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल घ्यायला हवी, असेही पवार यांनी म्हटले.

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात राज्यपालांनी आपल्या भाषणात वादग्रस्त वक्तव्य केले होते. शिवाजी महाराज हे जुन्या काळातील नायक असून नवीन काळात गडकरी हे नायक असल्याचे म्हटले होते. राज्यपालांच्या वक्तव्याने मोठा गदारोळ निर्माण झाला. विरोधकांनी राज्यपालांवर टीका करताना केंद्र सरकारने त्यांना माघारी बोलावावे अशी मागणी केली आहे.

राज्याचे राज्यपालांचे वैशिष्ट्य आहे की, गेले अनेक वर्ष आपण बघतो की वादग्रस्त विधान करण्याचा त्यांचा लौकीक आहे. चुकीची विधान करणे, समाजामध्ये गैरसमज वाढेल यांची खबरदारी घेणे असेच त्यांचे मिशन आहे की काय अशी शंका येते. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीमाईंबाबतचे त्यांचे वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे वक्तव्य पाहिले तर या सर्व गोष्टी असे सांगतात की, या पदावर जबाबदारीने भूमिका घेयची असते. परंतु याचे यत्किंचितही स्मरण नसलेली व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पाठवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा त्यांनी केलेला उल्लेख पाहता राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडलेल्या आहेत. काल त्यांनी शिवाजी महाराजांचे कौतुक केले. पण राज्यातून उमटलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांना उशिरा सूचलेले हे शहाणपण होते. राज्यपालांबद्दल अंतिम निकाल माननीय राष्ट्रपती व पंतप्रधानांनी घेतला पाहिजे. अशा व्यक्तीकडे अशा जबाबदाऱ्या देणे योग्य नाही.

गेली अनेक वर्षे बेळगाव, कारवार, निपाणी आदींची आपण मागणी करत आहोत. या भागात विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या. त्या अनेकदा जिंकल्याही. बेळगाव, कारवार, निपाणी आणखी जो परिसर आहे तो कर्नाटक सोडणार असेल तर काय त्यांना देयचे आहे याची चर्चा होऊ शकते. पण काहीच न करता मागणी करणे हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. त्याला आमचा कोणाचाही पाठिंबा नाही. कर्नाटकात भाजपाचे राज्य आहे तर महाराष्ट्रात भाजपाच्या पाठिंब्याचे राज्य आहे. त्यामुळे साहजिकच आहे की यांचा आत्मविश्वास वाढला आहे. काहीही मागण्या करा, कसेही वागा हे सर्व जे काही घडते त्याला जसे ते जबाबदार आहेत तसेच या देशातील सत्तेवर बसलेल्या भाजपाला जबाबदारी टाळता येणार नाही.

मी काही ज्योतिषी नाही, त्यामुळे मी काही सांगू शकणार नाही. माझा त्यावर विश्वासही नाही, त्यामुळे मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही. आपण आता हल्ली नवीन गोष्टी पाहत आहोत. महाराष्ट्रात याआधी असे होत नव्हते. आसाममध्ये काय घडले हे सर्व देशाला माहिती आहे. आता पुन्हा एकदा आसामची ट्रीप होणार असल्याचे मी वाचले. त्याच्याशी सुसंगत कार्यक्रम बंद करुन शिर्डीला जाणे आणि नंतर सिन्नरला जाऊन कोणाला तरी हात दाखवणे या गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य आहे, विज्ञानाचा पुरस्कार करणारे राज्य म्हणून लौकीक आहे. महाराष्ट्रात या नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. माझी खात्री आहे की, सुविद्य पिढी या सर्व गोष्टींचा स्वीकार करणार नाही. हे जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आत्मविश्वासाला धक्का बसतो तेव्हा लोक अशा गोष्टीकडे जातात.

बाजूच्या राज्यात निवडणुका आहेत म्हणून दुसऱ्या राज्यातील लोकांना सुट्ट्या द्यायचा प्रकार मी गेल्या ५५ वर्षात पाहिला नाही. याचा अर्थ एकच आहे की, भाजपला गुजरातमधील स्थिती चिंताजनक वाटते की काय, अशी शंका येते. आज राज्यामध्ये शेतकरी अस्वस्थ आहे, अतिशय संकटात आहे. अशावेळी राज्य सरकारची जबाबदारी शेतकऱ्याच्या पाठिशी उभे राहणे आहे. पण संबंधीची ठोस पावले राज्य सरकारने टाकलेली नाही. सबंध शेती अर्थव्यवस्था संकटात येत असताना या सगळ्यांकडे राज्य शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ते बघितल जात नाही. ही दुःखद बाब आहे.

जो प्रभावी असा लोकप्रतिनिधी आहे. त्याच्या कामात अडथळा निर्माण करणे, त्याला नाउमेद करणे, सत्तेचा गैरवापर करून त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला त्याच्या कामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझी पूर्ण खात्री आहे की, जितेंद्र आव्हाड कधी या सर्वांना बळी पडणार नाही. जो आमचा विचारांचा लढा आहे त्याच्याशी ते तडजोड करणार नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्याबाबतीत काल जी सुप्रीम कोर्टाने प्रतिक्रिया दिली, ती अतिशय स्वच्छ भूमिका सांगते. या सर्व नियुक्त्यांमध्ये कोर्टाला सुद्धा सांगायची वेळ येते. सुप्रीम कोर्ट इतकं स्पष्ट भूमिका घेत आहे याचे स्वागत आहे. सुप्रीम कोर्टालाही लक्षात आले की, सत्तेचा वापर कशा पद्धतीने केला जातोय.

आदित्य ठाकरे बिहारमध्ये तेजस्वी यादव यांची भेट घेत आहे. ही चांगली बाब आहे. शिवसेनेने राज्याबाहेरील नेत्यांसोबत चांगले संबंध ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यावर आदित्य ठाकरे लक्ष देत आहे, ही माझ्यादृष्टीने सकारात्मक बाब आहे.

आज पक्षाची अंतर्गत बैठक झाली. त्यामध्ये देशात व राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. त्यासाठी काही उपायोजना करणे आवश्यक आहे. महिल्यांवर होणारे अत्याचार ही बाब अतिशय गंभीर असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. श्रद्धा वालाकर प्रकरणात आधी काय घडले हे सांगण्यापेक्षा आता गृह खातं उपमुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यात त्यांनी लक्ष द्यावे.

Leave a Reply

%d bloggers like this: