fbpx

‘महानिर्मिती’च्या पदभरती प्रक्रीयेत सर्वांना अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करा अजित पवार यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

मुंबई : ‘महानिर्मिती’ कंपनीमध्ये कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता या पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत आरक्षित वर्गाला अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. अनारक्षीत वर्गाला अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य असल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे या नोकरभरतीत राज्यातील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता असून, त्यामुळे ‘महानिर्मिती’च्या पदभरती प्रक्रीयेत सर्वांना अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचे शुध्दीपत्रक तातडीने काढण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील ‘महानिर्मिती’ कंपनीमध्ये कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता या पदांच्या भरती प्रक्रीयेसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या पदभरतीच्या जाहिरातीत आरक्षित वर्गाच्या उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. मात्र अनारक्षित वर्गाच्या उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य असल्याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे परराज्यातील उमेदवार सुध्दा या भरती प्रक्रीयेत सहभागी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

त्यामुळे आपल्या राज्यातील स्थानिक खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होऊ शकतो. या अगोदर महापारेषण कंपीनीने त्यांच्या जाहिरात क्र.4/2022 मध्ये महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र सर्वांना अनिवार्य केले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक उमेदवारांना न्याय देण्यासाठी ‘महानिर्मिती’ कंपनीने सुध्दा जाहिरात क्र.10/2022 च्या संदर्भांत शुध्दीपत्रक काढून अधिवास प्रमाणपत्र सर्वांना अनिवार्य करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: