Friday, May 29, 2026
Latest NewsNATIONALPUNE

75व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ; हजारो भक्तांचा सहभाग

​समालखा : ‘‘आत्मिकता व मानवतेतूनच परिपूर्ण मनुष्य घडू शकतो’’ असे मार्मिक उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी 75व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा विधिवत शुभारंभ करताना मानवतेच्या नावे दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केले.

​हा चार दिवसीय समागम निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथील विशाल मैदानांवर आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये देश-विदेशातील समाजाच्या विविध स्तरातील भाविक भक्तगण तसेच प्रभुप्रेमी सज्जन लाखोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामध्ये पुणे व महाराष्ट्रातूनही आलेल्या हजारो भक्तगणांचा समावेश आहे.
​सद्गुरु माताजींनी आपल्या संदेशामध्ये सांगितले, की मागील जवळपास दोन वर्षानंतर आज इथे देश-विदेशातून संतजन-भक्तजन एकत्र आले आहेत. कारण कोविड महामारीच्या कालावधीत माणसाला एकमेकाशी भेटणे सुद्धा अशक्य झाले होते. तथापि, संत सदोदित मानवतेच्या सेवेसाठी तत्पर असतात याचेच प्रमाण देत कोरोना महामारीच्या कालावधीत रक्तदान शिबिरे, निरंकारी सत्संग भवनांचे कोविड केअर सेंटर्समध्ये रूपांतरण, कोविड लसीकरणासाठी विशेष शिबिरे तसेच गरजू नागरिकांना सहाय्य अशा विविध उपक्रमांद्वारे मानव सेवेचे कार्य निरंकारी संतांनी केले आहे.
​सद्गुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले, की कोरोना महामारी व्यतिरिक्त जगाच्या काही भागांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानेदेखील लोकांच्या मनामध्ये द्वेषभावना वाढलेली आहे ज्यामुळे मानवा-मानवामध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत. या भिंती केवळ प्रेमरूपी पुल उभारूनच जमिनदोस्त केल्या जाऊ शकतात. तेव्हाच एकत्वाच्या भावनेतून आपुलकी निर्माण होईल आणि मनुष्य शांतीसुखाचे जीवन जगू शकेल.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उल्लेख करुन सद्गुरु माताजी म्हणाल्या, की हे मिशनदेखील याच वर्षी ७५वा वार्षिक निरंकारी संत समागम साजरा करत आहे. देशस्वातंत्र्यातून आपल्याला भौतिक स्वातंत्र्याचा लाभ निश्चितच झालेला आहे तथापि, जर आत्मिक रुपातील स्वातंत्र्य हवे असेल तर आत्म्याचे नाते परमात्म्याशी जोडल्याशिवाय ते अशक्य आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने मानवी गुणांनी युक्त जीवन जगता येईल आणि मुक्तीचा मार्गही प्रशस्त होईल.
​तत्पूर्वी आज दुपारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि त्यांचे जीवनसाथी राजपिता रमितजी यांचे समागम स्थळावर आगमन होताच समागम समन्वय समितीच्या सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक स्वागत केले. त्यानंतर या दिव्य जोडीला एका फुलांनी सुसज्जित केलेल्या खुल्या वाहनामध्ये विराजमान करुन मुख्य मंचाकडे नेण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading