देशाचे नुकसान होत असेल तर भारत जोडो यात्रा आडवून दाखवा – राहुल गांधी
अकोला : कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. सावरकरांनी इग्रजांना पत्र लिहीलं. सावकरांनी पत्राच्या माध्यमातून माफीनामा सादर केला. त्यांनी इंग्रजांची मदत केली हे सत्य नाकारता येणार नाही. सत्ताधाऱ्यांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे. आम्हाला संसदेत बोलू दिलं जात नाही. त्यामुळे आता जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय उरला नाही, देशाचे नुकसान होत असेल तर भारत जोडो यात्रा आडवून दाखवा असे थेट आव्हानही राहुल गांधी यांनी केलं आहे.
दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. आंदमानात असताना सावरकर यांनी इंग्रजांना पत्र लिहीलं. तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या पण माझी सुटका करा असं सावरकर यांनी या पत्रात म्हटल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. पुढे बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर देखील जोरदार टीका केली आहे. राज्यात रोजगार नाही. शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नसल्यानं तरुण पिढी नैराश्यात आहे. महागाई वाढली आहे. सरकारी शाळा बंद करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. सरकारी शाळा बंद झाल्या तर गरिबांनी कुठे शिकायचं असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
भारत जोडो यात्रेतून देशाचे नुकसान होत असेल तर त्यांनी ही यात्रा रोखावी, असेही राहुल गांधी म्हणाले. सध्या देशापुढे दोन मोठ्या समस्या आहेत. देशातच युवकांना रोजगार मिळत नाही. दुसरे म्हणजे सध्या शेतकऱ्यांना कोणताच दिलासा मिळत नसल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. शेतकरी वेळेला पीक विमा भरतात मात्र, त्यांना पैसे मिळत नसल्याचे गांधी यावेळी म्हणाले. त्यांचे कर्ज माफ होत नाही, संकटाच्या काळात त्यांना मदत मिळत नसल्याचे गांधी म्हणाले. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.
पैशांचं आमिष देऊन विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. 50 कोटी रुपये देऊन आमदार खरेदी केले जात आहेत. सध्या सर्वाचं पोट भरणारा शेतकरी संकटात आहे. देशात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असल्याचे गांधी म्हणाले. विदर्भातील शेतकरी समस्येत असताना आमच्या सरकारनं त्यांना मदत केल्याचे राहुल गांधी म्हणाले. ही यात्रा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जाणारच असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
