नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला संजय राऊत यांच्या सुटकेचा विशेष आनंद
पुणे : शिवसेना खासदार, ज्येष्ठ नेते, प्रवक्ते आणि दै. सामनाचे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांची आज न्यायालयाने जामिनावर सुटका केलेली आहे. न्यायालयाचे सर्वप्रथम मनापासून आभार मानत असून संजय राऊत यांचे अभिनंदन मी करीत आहे.
न्यायालयाचे काही नियम आणि त्यांची अंमलबजावणी याबाबत दीर्घ काळ तपास चालू शकतो. मात्र असा तपास करणे योग्य आहे किंवा नाही तसेच याबाबत नेमकी काल मर्यादा काय आहे आणि अशा विषयात एखाद्या व्यक्तीला किती दिवस तुरुंगात ठेवणे योग्य आहे किंवा नाही याचा निर्णय न्यायालय करीत असते. त्या दृष्टीने न्यायालयाने योग्य तो निर्णय घेतला आहे. देशाच्या चौकटीत केंद्रीय तपास यंत्रणांनी एखाद्या व्यक्तीचा तपास किती दिवस सुरु ठेवायचा याविषयी आता अधिक स्पष्टता येण्याची आवश्यकता आहे. याबाबत योग्य ती कालमर्यादा निश्चित नसल्याने त्याबाबत वेळेचा अतिरेक होत असल्याचे आपल्याला दिसत आहे.
न्यायालयाच्या निर्णयामुळे आज श्री. संजय राऊत लवकरच बाहेर येत आहेत. मधल्या काळात जवळजवळ १०० दिवस त्यांनी त्रास सहन केला आहे. अनेक सुख दुःखांच आणि अनेक प्रसंगात त्यांनी शिवसेनेचे साथीदार म्हणून भूमिका निभावली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचे ते अतिशय जवळचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची प्रतिमा उभ्या जगाला माहित आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रसंगाला धीराने तोंड दिले त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन मी करीत आहे.
येत्या काळात त्यांच्यावर पक्षाने टाकलेल्या जबाबदाऱ्या तेवढ्याच ताकदीने आणि आत्मविश्वासाने ते पार पाडतील. किंबहुना त्यांचा अतिशय मोठा वाटा पुढील काळातील वाटचालीत असणार आहे. त्यांच्या सुटकेने मला व्यक्तिश:ही आनंद झाला असून याबद्दल मी ईश्वराचे आणि आई तुळजाभवानीचे आभार व्यक्त करते.
