गुवाहाटीला जाऊन सरकार पाडणे म्हणजे ही चोरवाट आहे अजित पवार यांचा एकनाथ शिंदे टोला
शिर्डी:स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका वेळेवर घेणे ही राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे; हे खरं असलं तरी राज्य शासन आणि न्यायालयांनीही त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाला त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी, या सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षित असते. मला वाटतं की, निवडणुका लांबविणे ही सध्याच्या शिंदे सरकारची गरज झाली आहे. त्यांना जनाधार नाही. लोकांची सहानुभूती महाविकास आघाडीकडे आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. शिवाय त्यांची चूकही त्यांना उमगली आहे; पण ते जाहीरपणे कबूल करू शकत नाही. सरकारं येतात जातात; निवडणुकीत मतदारांनी विजयी कौल दिल्यावर सरकार येते, ते खरे कर्तृत्व असते. त्यात आनंद असतो किंवा पराभव झाला तरी तोही जनतेचा कौल असतो; पण गुवाहाटीला जाऊन सरकार पाडणे म्हणजे ही चोरवाट आहे. अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली.
. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या शिबिराला पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबोधित केले. ते म्हणाले,’ ‘पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, सन्माननीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत आहे. या शिबिराच्या नियोजन, आयोजन, समन्वयात योगदान दिलेले पक्षातील सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक बंधू-भगिनींचं अभिनंदन करतो. आभार मानतो. धन्यवाद देतो.
अजितदादा म्हणाले, या शिबिरात आपल्यसमोर बोलण्यासाठी ‘राज्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुका’ हा विषय मला दिला आहे. अनेक कारणांसाठी हा विषय महत्वाचा आहे, असं मला वाटतं. येणाऱ्या काळात, लवकरच, राज्यातल्या २३ महानगरपालिका, २२१ नगरपरिषदा-नगरपंचायती, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या आणि ७ हजार ५०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांची पूर्वतयारी या शिबिरातून आपल्याला करायची आहे. सर्वोच्च न्यायालयानं सद्यस्थितीत, ग्रामपंचायती वगळता, इतर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत ‘जैसे थे’ आदेश दिला आहे. असं असलं तरी, ही स्थगिती कधीही उठू शकते. निवडणुका एक-दोन महिन्यात जाहीर होऊ शकतात, त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहिलं पाहिजे. मला आनंद आहे की, अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. ही आघाडी आणि वेग आपल्याला टिकवायचा आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतून, पक्षाच्या गाव, शहर, तालुका, जिल्हा पातळीवरील अधिकाधिक कार्यकर्त्यांना, सत्तेत येण्याची, लोकसेवा करण्याची संधी मिळत असते. स्थानिक स्वराज संस्थांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते हेच स्थानिक सत्तेच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी, पक्षाच्या बळकटीकरणासाठी ताकद देत असतात. याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भविष्यातले आमदार, खासदार पक्षाला मिळत असतात. त्यातून पक्षसंघटन वाढते. स्थानिक स्वराज संस्थांमधलं यशंच, येणाऱ्या काळात पक्षाची, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची वाट सोपी करणार आहेत, हे लक्षात घेऊन अधिकाधिक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आणि ग्रामपंचायतीत आपल्या विचारांची माणसं निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अजितदादांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले. सन्माननीय प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली, माझ्यासह, पक्षाच्या जिल्हा, तालुका अध्यक्षांपासून बुथ-मतदार यादी लेव्हलपर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनं, आतापासून कामाला लागावे. मतदार यादी बुथप्रमुख, पन्ना प्रमुख यांच्याशी स्थानिक नेतृत्वाने संपर्कात राहावे. त्यांच्या अडचणी दूर करण्याचा, त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करावा, असे अजितदादांनी सांगितले.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी, पंचायत राज्य व्यवस्था आणली. स्थानिक स्वराज संस्थांच्या माध्यमातून सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं काम केले. नंतरच्या काळात आदरणीय साहेबांच्या नेतृत्व, मार्गदर्शनात महिलांसाठी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये, महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय आपण घेतला. हा निर्णय महिलांपर्यंत, घराघरात पोहचवला पाहिजे. आज स्थानिक स्वराज संस्थांमध्ये 50 टक्के महिला निवडून येतात. त्या जागांवर, राष्ट्रवादीच्या विचारांच्या उमेदवार अधिकाधिक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणसाठी राष्ट्रवादीने केलेले कार्य घराघरात पोहचवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
