Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

कलाकार कट्ट्यापासुन पुणे मनपातील कंत्राटी कामगारांच्या जनसंवाद कार्यक्रमाला सुरूवात

पुणे:नेहमीच गजबज असलेल्या गुडलक चौकातील कलाकार कट्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी विविध कलाकार आपली कला सादर करत असतात. पण आज 12 ऑक्टोबर रोजी हा कलाकार कट्टा पुणे मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाने गजबजलेला होता. निमित्त होत राष्ट्रीय मजदुर संघाच्या पुणे मनपा कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर राष्ट्रीय मजदुर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेला जनसंवाद.
गेले 4-5 महिने पगार न झाल्यामुळे या कामगारांनी त्यांच्या व्यथा घोषणा देत, गाणी गात नागरिकांशी संवाद साधला.

पुण्याला स्मार्ट सिटी बनवणाऱ्या आरोग्य कोठितील साफसफाई कर्मचारी, स्मशानभूमी, पाणीपुरवठा, सुरक्षारक्षक, वेहिकल डेपोच्या कर्मचाऱ्यानी कोवीड काळातील स्वत:ची पर्वा न करता काम करूनही न मिळालेला भत्ता, ना सन्मान, ना वेळेवर पगार ना सुट्ट्या, दिवाळीत पगार नसल्यामुळे शिमगा करावा लागेल अशा विविध समस्या लोकांसमोर मांडल्या.

पगार स्लीप वेळेवर मिळत नाही, फंडाची रक्कम जमा होत नाही, ESIC कार्ड दिलं जात नाही, दिवाळी तोंडावर असूनही कामगाराच्या हक्काचा बोनस मिळत नाही या अडचणींवर आवाज उठवण्यासाठी, जागरूक पुणेकरांशी संवाद साधण्यासाठी हा जनसंवाद करत आहोत. पुणे शहरातील विविध भागात होणाऱ्या जनसंवादाची ही पहिली सुरवात आहे आणि हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे असे राष्ट्रीय मजदुर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले. तर उपाध्यक्ष सीताराम चव्हाण म्हणाले वेळोवेळी पुणे मनपा प्रशासकीय यंत्रणेला कळवूनही आमचे प्रश्न सुटत नाही म्हणून मंगळवारी 18 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 10 पासून पुणे मनपा गेट जवळ कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन करणार आहोत असे सांगितले. पुणे मनपाला यंदाच्या पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी 400 कोटी, नदी सुधार प्रकल्पासाठी 4000 कोटी, कापडी पिशव्या साठी 16 कोटी खर्च करायला पैसे आहेत तर मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे का नाहीत असा सवाल मजदुर संघाचे कार्यकर्ते विशाल बागुल यांनी केला. यावेळी पदाधिकारी जान्हवी दिघे, मेघा वाघमारे, उज्वल साने, संदीप पाटोळे, सचिन भालेकर यांनी ही आपली मनोगत व्यक्त केली. या जनसंवादात लोकायत संघटनेचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. कंत्राटी कामगार उपाशी ठेकेदार-मनपा तुपाशी,आमचा लढा कशासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी अशा घोषणा देण्यात आल्या. पुणे नागरिकांनी या जनसंवादाला उस्फूर्त प्रतिसाद दिला. सुरक्षा रक्षक विजय पांडव यांनी जनसंवादाची भूमिका मांडली. तर शंकुतला भालेराव यांनी सूत्र संचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading