अतिवृष्टीमुळे नापिकी आणि पिककर्जाच्या बोज्यामुळे घडलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत उपाय योजना कराव्यात : डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई: राज्यात अतिवृष्टीमुळे यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांमध्ये सोयाबीन व कापूस पिकांचे आत्यंतिक नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. या कारणाने मागील तीन दिवसात अमरावती मध्ये दहा तर यवतमाळ जिल्ह्यात तीन पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परतीच्या पावसाचा कहर व नापीकीचा सर्वात जास्त फटका बसलेल्या विदर्भात पहिल्या नऊ महिन्यातच अकराशेहुन अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असल्याचे समजते आहे. या अनुषंगाने आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी मुख्य सचिवांना निवेदनाद्वारे तातडीने उपाय योजना करण्याबाबत अनेक मुद्द्यांवर सविस्तर निर्देश दिले आहेत. याबाबत आज त्यांनी एक निवेदन दिले आहे.
विदर्भातील शेतकरी आत्महत्याच्या पार्श्वभूमीवर पुढील उपाययोजना तातडीने करण्याबाबत त्यांनी तपशीलवार निर्देश दिले आहेत.
१) विदर्भातील मागील तीन महिन्यांच्या काळात झालेल्या शेतकरी आत्महत्यांचे पंचनामे आणि शवविच्छेदन अहवाल तातडीने पूर्ण करावेत.
२) संबंधित तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांचे स्तरावरील बैठका घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी.
३) बदलत्या हवामानामुळे विदर्भ व मराठवाड्यात पीक पद्धती बदलणे ही आवश्यक आहे. या ही दृष्टीने नियोजन करावे.
४) अतिवृष्टीमुळे प्राप्त झालेल्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजनासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात.
५) या घटनेमुळे विधवा झालेल्या पत्नीचे शासकीय स्तरावरून समुपदेशन करण्याची व्यवस्था करण्यात यावी.
६) या विधवांची व त्याच्या वारसांची नावे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मालमत्तांना वारसांची नावे लावण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना सूचना द्याव्यात.
वरील मुद्द्यांना अनुसरून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागांना द्यावेत असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदर निवेदनाच्या माध्यमातून मुख्य सचिवांना सांगितले आहे. या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या यंत्रणेने भरीव उपाय योजना करण्याची आवश्यकता असल्याच्या मुद्द्यावर डॉ. गोऱ्हे यांनी प्रकाश टाकला आहे.
