fbpx

पुण्यात मराठासेवक समितीचा मराठा दसरा मेळावा संपन्न

पुणे : मराठासेवक समिती महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित केला जाणारा मराठा दसरा मेळावा काल पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह याठिकाणी उत्साहात पार पडला. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातुन एकत्र आलेल्या मराठासेवकांच्या माध्यमातुन दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जात असून यंदा या मेळाव्याचे सहावे वर्ष होते.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण  गायकवाड, जालना येथील महिला उद्योजक सीताबाई मोहिते, बँक पतपुरवठा विषयाचे अभ्यासक प्रा.श्रीधर भवर आणि युवा प्रवचनकार चैतन्य महाराज वाडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रविण गायकवाड यांनी “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला” या विषयावर मार्गदर्शन करताना मराठा तरुणांनी आरक्षणाच्या पलीकडे जाऊन अर्थकारणाच्या विषयाकडे वळावे असे मत मांडले. तसेच परदेशात उपलब्ध असणाऱ्या नोकरी, उद्योग व्यवसायाच्या संधींची माहिती देऊन त्यांनी भविष्यात मराठा समाज हा बिजनेस कम्युनिटी म्हणून ओळखला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

सीताबाई मोहिते यांनी “शेती व शेतीपुरक व्यवसाय” या विषयावर बोलताना बाजारात जे विकले जाते ते आपल्या शेतीत पिकवता आले पाहिजे हा विचार मांडला. यावेळी आवळा कँडी व्यवसायातील आपल्या यशाचा प्रवास उलगडून सांगितला. शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी तरुणांची मानसिकता व्यावसायिकाची असावी लागते असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. प्रा.श्रीधर भवर यांनी “नवीन व्यवसाय व भांडवल उभारणी” या विषयावर मार्गदर्शन करताना नवउद्योजकांना भांडवल उभारणी करताना किंवा कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्याचे उपाय यावर भाष्य केले. बँकेच्या माध्यमातून भांडवल उभारणी करताना कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींवर सजगपणे लक्ष दिले पाहिजे यातील बारकावे त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले.

युवाकीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांनी “महापुरुषांचे विचार व आजचा तरुण” या विषयावर मांडणी करताना तरुणांना वर्तमानातील आपल्या खऱ्या समस्या काय आणि त्या दूर करण्यासाठी आपल्या महापुरुषांनी सांगितलेले विचार किती दिशादर्शक आहेत यावर प्रकाश टाकला. आजची तरुणाई कोणत्या दिशेला चालली असा प्रश्न विचारुन त्यांनी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याची खंत मांडली.
यंदाच्या दसरा मेळाव्यात नोकरी, उद्योग-व्यवसायात काम करणार्‍या ले छ्लांग फाऊंडेशन, मराठा उद्योजक लॉबी, प्रियदर्शनी बँक ली.कळंब यांचा तर कोरोंना काळात केलेल्या कामाबद्दल वर्ल्ड माराठा ओर्गनायजेशन पुणे टिम सन्मान करण्यात आला. 

Leave a Reply

%d bloggers like this: